- गोगामुखच्या निवडणूक प्रचार सभेत पंतप्रधानांचा दावा
आसाममध्ये गेल्या १० वर्षांत भाजपने चांगली विकास कामे केली आहेत. भाजपच्या कार्यकाळात राज्य प्रगतीपथावर आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत (Assam Assembly Election 2026) भाजप विजयाची हॅट्रिक करेल असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra MOdi) यांनी केला. राज्यातील गोगामुख येथे बुधवार, १ एप्रिल रोजी निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
पूर्वी सर्वानंद सोनवाल आणि सध्या हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली असममध्ये विकास आणि सुशासनाचा नवा काळ सुरू झाला आहे. पूर्वी काँग्रेस अनेक वर्षे सत्तेत होती. परंतु, त्यांनी आसामच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. ब्रह्मपुत्र नदीवर कमी पूल बांधले गेले, तसेच समाजात विभागणी निर्माण केली, असा आरोप मोदींनी केला. काँग्रेसवर ‘कम्युनल व्हायोलन्स’ कायद्याच्या माध्यमातून मतपेटीचे राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला. हा कायदा बहुसंख्यांकांवर अन्याय करणारा होता, असे मोदी म्हणाले. आसामला नैसर्गिक संसाधनांची मोठी देणगी मिळाली आहे आणि आता राज्याला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही मोठे स्थान मिळणार आहे. लवकरच असममध्ये सेमीकंडक्टर प्लांट सुरू होईल, ज्यामुळे राज्य आधुनिक तंत्रज्ञानाचे केंद्र बनेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच ‘विकसित असम ते विकसित भारत’ हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी भाजपला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.