- शक्य असल्यास ही रेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत विस्तारित करा
- रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे खासदार रविंद्र वायकर यांनी केली मागणी
नवी दिल्ली : कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या पसंतीची दादर-रत्नागिरी पॅसेंजर रेल (Dadar-Ratnagiri passenger) पुनश्च दादर स्थानकातून सुरु करण्यात यावी तसेच शक्य असल्यास ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) पर्यंत विस्तारित करून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलास द्यावा, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी निवेदनाद्वारे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
दिवा स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना अतिरिक्त लोकल रेल्वेने प्रवास करावा लागतो, ज्यामुळे वेळ, खर्च आणि शारीरिक त्रास वाढतो. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रात्रीच्या वेळेत प्रवास करणाऱ्यांसाठी ही अडचण अधिक गंभीर ठरते. रस्त्याने प्रवास करायचा झाल्यास मुंबई–गोवा महामार्गाची स्थिती अनेक ठिकाणी अत्यंत खराब आहे, ज्यामुळे प्रवास कठीण आणि धोकादायक होतो. अशा परिस्थितीत ही पॅसेंजर रेल कोकणातील सामान्य नागरिकांसाठी एक विश्वासार्ह, सोयीस्कर वाहतूक व्यवस्था होती, असे खासदार यांनी रेल्वे मंत्री यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
खासदार वायकर यांनी दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी या विषयावर सविस्तर निवेदन रेल्वे मंत्री पाठवले होते. परंतु त्यानंतरही रेल्वे विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. रेल्वे प्रशासनाच्या सततच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी वाढत आहे. हा केवळ रेल्वेचा मुद्दा नसून कोकणातील जनतेच्या भावना आणि त्यांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित विषय असल्याने, यात लक्ष घालून दादर–रत्नागिरी पॅसेंजर रेल तात्काळ पूर्ववत दादर स्थानकापर्यंत सुरू करण्याचे आदेश द्यावेत. तसेच शक्य असल्यास प्रवाशांच्या सोयीसाठी ही रेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) पर्यंत वाढवावी, ज्यामुळे मुंबईतील अधिकाधिक प्रवाशांना थेट आणि सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल. यामुळे कोकणात जाणाऱ्या लाखो सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, अशी विनंती खासदार वायकर यांनी रेल्वे मंत्री यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.