नवी दिल्ली: अमेरिकेच्या लष्कराने इराणमधील इस्फहान येथील एका मोठ्या दारूगोळ्याच्या गोदामाला लक्ष्य केले. या हल्ल्यात २,००० पौंड वजनाच्या बंकर-भेदी बॉम्बसह इतर अनेक धोकादायक बॉम्ब वापरण्यात आले. ट्रम्प यांनी 'ट्रुथसोशल'वर रात्रीच्या आकाशात प्रचंड स्फोट दाखवणारा एक व्हिडिओ पोस्ट केला. हा हल्ला ज्या क्षणी झाला, त्याच क्षणी या व्हिडिओमध्ये चित्रित झाला असल्याचे मानले जाते.
वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार आणि एका अमेरिकी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने इराणच्या इस्फहान शहरातील एका मोठ्या दारूगोळ्याच्या गोदामावर २,००० पौंडांचे बंकर-बस्टर बॉम्ब वापरले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनीही 'ट्रुथ सोशल'वर एक कॅप्शन नसलेला व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये रात्रीच्या आकाशात अनेक स्फोट होताना दिसत आहेत. अधिकाऱ्याने सांगितले की, हा व्हिडिओ प्रत्यक्ष हल्ला कसा झाला हे दाखवतो. वॉल स्ट्रीट जर्नलनुसार, या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात भेदक दारुगोळा वापरण्यात आला, ज्यामुळे भूमिगत आणि तटबंदी असलेल्या ठिकाणांचे मोठे नुकसान झाले.
इस्फहान का महत्त्वाचे?
इस्फहान हे मध्य इराणमधील एक प्रमुख शहर आहे, जे राजधानी तेहरानच्या दक्षिणेला झायंदेह नदीच्या काठावर वसलेले आहे. इराणने आपला सुमारे ५४० किलोग्रॅम अत्यंत संवर्धित युरेनियमचा काही भाग इस्फहान शहरातील भूमिगत सुविधांमध्ये हलवला असल्याचे म्हटले जाते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याची धमकी दिली. ज्यात देशाच्या क्षारविरहितीकरण प्रकल्पांचा समावेश आहे. अशा प्रकारच्या कृतींमुळे पाणीटंचाई असलेल्या मध्य-पूर्वेवर विनाशकारी परिणाम होऊ शकतात.
ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले की, जर युद्ध संपवण्यासाठी लवकरच करार झाला नाही. तसेच ज्यामधून टँकरद्वारे मोठ्या प्रमाणात तेलाची वाहतूक होते ती होर्मुझची सामुद्रधुनी तात्काळ उघडली नाही, तर आम्ही इराणचे सर्व वीज प्रकल्प, तेल विहिरी आणि खारग बेटांना उडवून देऊन पूर्णपणे नष्ट करू. ज्यांना आम्ही अद्याप हात लावलेला नाही.