पुणे : विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी असताना नीलम गोऱ्हे राजकीय भविष्य जाणून घेण्यासाठी अशोक खरातची भेट घेतली होती, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. या आरोपावर अखेर नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया आली आहे. एक प्रसिद्धीपत्रक काढून शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी स्वत:ची बाजू मांडली आहे. माझी प्रतिमा स्फटिकाप्रमाणे स्वच्छ आणि पारदर्शी आहे, असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. माझ्या कामाची पद्धत आणि माझी तत्वे कधीही कोणापासून लपलेली नाहीत, असेही त्या म्हणाल्या. देवावर श्रद्धा आहे, कोणत्याही ढोंगी बाबावर नाही असे सांगत त्यांची स्वतःची बाजू मांडली.
महिलांची प्रगती व्हावी, सामाजिक न्यायासाठी काम करता यावे म्हणून राजकारणात आल्याचे नीलम गोऱ्हेंनी सांगितले. प्रबोधनकारी हिंदुत्व मानते असेही त्या म्हणाल्या. एखादे राजकीय पद किंवा मंत्रिपद मिळवण्याच्या हेतूने बुवाबाजी कधीही केली नसल्याचेही त्यांनी सांगितले. अशोक खरातला भेटल्याचा आरोप त्यांनी फेटाळला.
माझी सामाजिक व राजकीय कृतिशीलता, विधानपरिषदेचे उपसभापती पद आणि मंत्री दर्जा यामुळे काही मोजक्या व्यक्तींमध्ये द्वेष निर्माण झाला आहे. अधिवेशन काळातील माझे संसदीय कार्य, सातारा एस.पी. निलंबन आदेशाची अंमलबजावणी आणि निरोपाच्या वेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माननीय सुनेत्रा पवार यांनी माझी जी प्रशंसा केली, ती काही हितशत्रूंना सहन झालेली नाही. विशेषतः पुणे महानगरपालिकेत ज्यांना यश मिळाले नाही, असे काही असंतुष्ट घटक माझ्याविरुद्ध हे विषारी षडयंत्र रचत आहेत, असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
ज्यावेळी ही बातमी आली, त्यावेळी २३ तारखेला अधिवेशन नुकतेच सुरू झाले होते. माननीय मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची 'SIT' चौकशी आधीच म्हणजे १३ मार्च रोजी जाहीर केली होती. अशा वेळी पीठासीन अधिकारी (Presiding Officer) म्हणून मी काहीही भाष्य करणे हे संसदीय नियमांनुसार चौकशीत हस्तक्षेप ठरला असता. म्हणूनच, मी अधिवेशनाच्या काळात संयम राखला. मात्र, अधिवेशन संपताच २६ तारखेला आयोजित कार्यक्रमात मी माझी कठोर भूमिका स्पष्ट केली आहे; असेही नीलम गोऱ्हे यांनी जाहीर केले.