नवी दिल्ली : बातमीचं हेडिंग वाचून चक्रावला असाल. पण हा एक अभिनव प्रयोग आहे. भारतात मुंबई, उदयपूर, जयपूर येथे या सिनेमाचं शूटिंग झालंय. हा एक बॉलीवूड-शैलीतील संगीतमय विनोदी सिनेमा आहे. यात 'जिमी जिमी आजा आजा' या हिंदी गाण्याचाही समावेश आहे. 'पर्सिमॉन ऑफ माय लव्ह' (Persimmon of My Love) हा सोव्हिएत काळापासूनचा पहिला मोठा रशियन-भारतीय चित्रपट सहयोग आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत भारतीय भूमीवर चित्रित झालेला हा पहिलाच रशियन चित्रपट आहे जो १ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
'पर्सिमॉन ऑफ माय लव्ह' या बॉलिवूडच्या मसाल्यानं खच्चून भरलेल्या रशियन सिनेमासाठी सेटवर दररोज ३५० पेक्षा जास्त कलाकार आणि क्रू काम करत होते. सिनेमात काही गर्दीच्या दृश्यांमध्ये एक हजारपेक्षा जास्त नागरिकांचाही समावेश आहे. रशियन सिनेमासाठी ही एक विशेष बाब आहे. ही भव्यता क्लासिक बॉलीवूडची आठवण करून देते.
सिनेमाची कथा लहानपणीच विभक्त झालेल्या दोन भावांची आहे, एक प्रामाणिक पोलीस अधिकारी, रमाश, आणि दुसरा गुंड शामर. न्याय, कौटुंबिक रहस्ये, प्रेम आणि साहस यांची रुचकर भेळ अनुभवण्याची संधी हा सिनेमा देतो. सिनेमातील संघर्ष खुरमाडा नावाच्या एका काल्पनिक भारतीय शहरात घडतो. सिनेमासाठी रशियन विनोदी कलाकार डेमिस करिबिडिस आणि मिखाईल गलुस्त्यान यांनी भावांच्या भूमिका साकारल्या आहेत. करिबिडिस यांनीच पटकथाही लिहिली आहे. सहाय्यक कलाकारांमध्ये आदिला रागीमोवा, अल्बिना कबालिना, आर्तुर वाखा आणि सर्गेई रोस्ट यांचा समावेश आहे. भारतीय नृत्यदिग्दर्शक जय कुमार यांनी नृत्यांचे दिग्दर्शन केले आहे. तर रशियन संगीतकार झुराब मातुआ यांनी मूळ संगीत तयार केले आहे, ज्यात हिंदीतील गाण्यांचाही समावेश आहे.
मुंबईतील स्टुडिओ तसेच राजस्थानमधील राजवाडे आणि किल्ले यांचा सिनेमात सुरेख वापर केला आहे. संपूर्ण कॅन्व्हास रंजक आणि रंगीत ठेवण्यावर प्रचंड भर दिल्याचे दिसते. मायवेस्टुडिओसोबत या सिनेमाची सह-निर्मिती करणाऱ्या गॅझप्रॉम-मीडिया होल्डिंगच्या उप-महासंचालक आणि टीएनटी वाहिनीच्या संचालक, टीना कंदेलाकी या पण 'पर्सिमॉन ऑफ माय लव्ह' सिनेमाला प्रेक्षक कसे स्वीकारतात हे जाणून घेण्यास उत्सुक आहेत. बॉलिवूडच्या भावना आणि संगीत आणि रशियन नाट्यशैली यांसारख्या दोन देशांच्या सर्जनशील परंपरा किती नैसर्गिकरित्या एकत्र येऊ शकतात, हे हा सिनेमा दाखवतो, असे टीना कंदेलाकी यांनी सांगितले.
'लव्ह इन द बिग सिटी' आणि 'द टेमिंग ऑफ द श्रू' यांसारख्या यशस्वी चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक मारियस वेसबर्ग यांनी भारतीय टीमच्या वेगाची आणि व्यावसायिकतेची प्रशंसा केली. “बॉलिवूडच्या टीमनी ज्या व्यावसायिकतेने आणि ज्या वेगाने काम केले ते पाहून मी थक्क झालो. हा एक प्रचंड मोठा उद्योग आहे जो निर्मितीतील सर्वात मोठी आव्हाने पेलण्यास सक्षम आहे,” असे ते म्हणाले.
रशियन सिनेमा फंड आणि एएसबी फिल्म व्हिलेजसह भारतीय भागीदारांच्या पाठिंब्याने तयार झालेला हा सिनेमा रशिया आणि भारत यांच्यातील तसेच ब्रिक्स देशांमधील सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होत असल्याचे दाखवून देतो. सोव्हिएत काळापासून भारतीय सिनेमांशी परिचित असलेल्या रशियन प्रेक्षकांना, बॉलीवूडचा भव्यपणा, हलका आत्म-उपहास आणि रशियन विनोदाचे हे मिश्रण एक नवीन आणि समयोचित मेजवानी वाटू शकते. 'पर्सिमॉन ऑफ माय लव्ह'चा प्रीमियर १ एप्रिल रोजी मॉस्कोमध्ये होणार आहे.