पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक डार (Ishaq Dar) इस्लामाबादमध्ये परदेशी पाहुण्यांचे स्वागत करताना अचानक पडल्याची घटना घडली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मध्यपूर्वेतील संकटावर चर्चा करण्यासाठी रविवारी (२९ मार्च) इस्लामाबादमध्ये आलेल्या परराष्ट्र मंत्र्यांचे स्वागत इशाक डार करत होते. यावेळी ते इजिप्तचे परराष्ट्र मंत्री बद्र अब्देलट्टी यांचे स्वागत करत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते घसरून खाली पडले. यानंतर सुरक्षा कर्मचारी त्यांना जमिनीवरून उचलतात. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. व्हिडिओमध्ये इशाक डार तोल जाऊन पडताना स्पष्टपणे दिसत आहेत.
या बैठकीत मध्यपूर्वेतील वाढता तणाव कमी करण्याच्या उपायांवर चर्चा करण्यात आली. इस्लामाबादमध्ये संभाव्य अमेरिका-इराण चर्चेच्या शक्यतांबाबतही इशाक डार यांनी उपस्थित मान्यवरांना माहिती दिली. या उपक्रमाला भेट देणाऱ्या परराष्ट्र मंत्र्यांनी पूर्ण पाठिंबा दर्शविल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पाकिस्तानने आयोजित केलेल्या या चार-पक्षीय बैठकीत इजिप्तचे परराष्ट्र मंत्री बद्र अब्देलट्टी, तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हाकान फिदान आणि सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान अल सौद सहभागी झाले होते. बैठकीनंतर पाकिस्तानी मंत्र्यांनी सांगितले की, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि लष्करी तणाव वाढण्याचा धोका कमी करण्यासाठी सर्व देशांनी एकजूट कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.