नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने नवा कर्णधार रियान परागच्या नेतृत्वात सोमवारी (३० मार्च) पहिल्या विजयाची नोंद केली आहे. घरच्या मैदानात गुवाहाटीमध्ये झालेल्या सामन्यात राजस्थानने चेन्नई सुपर किंग्स संघाला ८ विकेट्सने पराभूत केले. गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीनंतर वैभव सूर्यवंशीने स्फोटक फलंदाजी करत राजस्थानच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने राजस्थानसमोर १२८ धावांचे सोपे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग राजस्थानने १२.१ षटकात २ विकेटस गमावत १२८ धावा करत पूर्ण केला. राजस्थानकडून सूर्यवंशीने अर्धशतकी खेळी केली.
राजस्थानकडून यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी या दोन युवा खेळाडूंनी डावाची सुरुवात केली. वैभवने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता, दुसऱ्या बाजूला जैस्वाल संयमी खेळ करत त्याला साथ देत होता. वैभवने चेन्नईच्या कोणत्यात गोलंदाजाला त्याच्यावर वरचढ होऊ दिले नाही. त्याने पॉवरप्लेच्या षटकांमध्ये चौकार-षटकारांची बरसात करताना १५ चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले. तो राजस्थानसाठी सर्वात कमी चेंडूत अर्धशतक करणारा दुसरा खेळाडू ठरला. पहिल्या क्रमांकावर यशस्वी जैस्वाल असून त्याने २०२३ मध्ये १३ चेंडूत अर्धशतक केले होते.
अर्धशतकानंतर ७ व्या षटकात वैभवला अंशुल कंबोजने बाद केले. त्याचा झेल सर्फराज खानने घेतला. वैभवने ४ चौकार आणि ५ षटकारांसह १७ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. त्यानंतर ध्रुव जुरेल आणि जैस्वालने डाव पुढे नेला, पण कंबोजनेच ९ व्या षटकात जुरेलला १८ धावांवर त्रिफळाचीत केले. पण नंतर जैस्वालला कर्णधार रियान परागने साथ दिली आणि उर्वरित धावा पूर्ण करत राजस्थानला १३ व्या षटकात विजय मिळवून दिला. जैस्वाल ३६ चेंडूत ३८ धावांवर नाबाद राहिला. रियान पराग ११ चेंडूत १४ धावांवर नाबाद राहिला.
तत्पुर्वी राजस्थानने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. पण चेन्नईचा संघ १९.४ षटकात १२७ धावांवरच सर्वबाद झाला. चेन्नईने सुरुवातीलाच संजू सॅमसन (६), कर्णधार ऋतुराज गायकवाड (६), आयुष म्हात्रे (०) आणि मॅथ्यू शॉर्ट (२) यांच्या विकेट्स स्वस्तात गमावल्या होत्या. त्यानंतर सर्फराज खान (१७) आणि कार्तिक शर्मा (१८) यांनी थोडीफार लढाईकेली. पण तेही मोठी खेळी करू शकले नाहीत. पण याविकेट्स जात असताना ८ व्या क्रमांकावरील जेमी ओव्हर्टनने एकाकी झुंज दिली आणि संघाला १२० धावांचा टप्पा पार करून दिला. तो शेवटच्या षटकात बाद झाला आणि चेन्नईचा डाव संपला. त्याने ३६ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह ४३ धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून नांद्रे बर्गर, जोफ्रा आर्चर आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. ब्रिजेश शर्मा, संदीप शर्मा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.