आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात पहिल्या डावात बरेच कलाटणी देणारे क्षण ठरले. जोश हेझलवूडच्या जागी संधी मिळालेल्या जेकब डफीने ३ विकेट्स घेत हैदराबादची अवस्था ३ बाद २९ अशी दयनीय केली. पॉवर प्लेमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या सनरायझर्स हैदराबादला ३ बाद ४९ धावाच करता आल्या. कर्णधार इशान किशन व हेनरिच क्लासन या दोघांनी आरसीबीच्या हातून सामना खेचून नेला. या दोघांनी ५३ चेंडूंत ९७ धावांची भागीदारी करून हैदराबादला पुनरागमन करून दिले.
पण, रोमारिओ शेफर्डने १४व्या षटकात ही जोडी तोडली. क्लासन ३२ धावांवर माघारी परतला, परंतु फिल सॉल्टने घेतलेला झेल वादग्रस्त ठरला. त्यानंतर १६व्या षटकात इशानचा अविश्वसनीय झेल सॉल्टने टिपून सामन्याला पुन्हा कलाटणी दिली. इशान ३८ चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांसह ८० धावांवर बाद झाला. इशान बाद झाला तेव्हा सनरायझर्स हैदराबादच्या १५५ धावा होत्या आणि ते जास्तीत जास्त १८० पर्यंत पोहोचतील असे वाटले होते. मात्र, अनिकेत वर्माने १८ चेंडूंत ४३ धावा चोपून संघाला ९ बाद २०१ धावांपर्यंत पोहोचवले.
डफी व रोमारिओ शेफर्ड यांनी प्रत्येकी ३ बळी टिपले, भुवनेश्वर कुमार, अभिनंदन सिंग व सुयश शर्मा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. आरसीबीची सुरुवात काही खास झाली नाही आणि दुसऱ्या षटकात जयदेव उनाडकटने विकेट घेतली. फिल सॉल्ट ( ८) याचा झेल टिपण्यासाठी क्लासन व अनिकेत दोघंही पळाले, दोघांची टक्कर होता होता वाचली. पण, क्लासनने यशस्वी झेल टिपला. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या देवदत्त पडिक्कलचे वादळ घोंगवाले.
त्याने २१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले, जे आरसीबीकडून सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दुसरे वेगवान अर्धशतक ठरले. २०२४ मध्ये हैदराबाद येथे रजत पाटीदारने १९ चेंडूंत फिफ्टी केली होती. देवदत्त व विराट कोहली, ही जोडी सामना जिंकून देईल असेच वाटले. पण, ४५ चेंडूंत १०१ धावांची ही भागीदारी ९व्या षटकात तुटली. देवदत्त २६ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकारांसह ६१ धावांवर माघारी परतला. आरसीबीने १० षटकांत २ बाद १२६ धावा केल्या आणि ही या संघाची पहिल्या दहा षटकांतील तिसरी सर्वोत्तम धावसंख्या ठरली. कर्णधार रजत पाटीदारने १२ चेंडूंत ३१ धावा चोपून विराटसह २२ चेंडूंत ५३ धावा जोडल्या.
डेव्हिड पायनेने सलग दुसऱ्या चेंडूवर जितेश शर्माला बाद करून आरसीबीवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. डेव्हिडची हॅटट्रिक हुकली. विराटने ३३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि त्याचे हे आयपीएलमधील ही त्याची आयपीएलमधील ६४ वे अधर्शतक ठरले. आरसीबीने ६ विकेट्स राखून ही मॅच जिंकली. विराट ३८ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांसह ६९ धावांवर नाबाद राहिला.