ग्वाल्हेर : भारतीय लष्कराचे सामर्थ्य आता आणखी वाढणार आहे. मेक इन इंडिया अंतर्गत तयार झालेल्या तब्बल दोन हजार प्रहार लाईट मशिन गन जवानांना मिळाल्या आहेत. अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनीने या शस्त्राची निर्मिती केली आहे. लवकरच आणखी प्रहार लाईट मशिन गन भारताच्या जवानांना मिळणार आहेत.
अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनीने एका विशेष सोहळ्यात प्रहार लाईट मशिन गनची पहिली बॅच भारतीय लष्कराला सुपूर्द केली. याप्रसंगी संरक्षण मंत्रालयाचे खरेदी विभागाचे महासंचालक ए. अंबरासू, अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष राजवंशी तसेच अदानी डिफेन्सचे इतर अधिकारी उपस्थित होते. अंबरासू यांनी लष्करासाठीच्या एलएमजी अर्थात प्रहार लाईट मशिन गनने भरलेल्या ट्रकला हिरवा झेंडा दाखवला. यानंतर ट्रक लष्कराच्या छावणीच्या दिशेने रवाना झाला.
अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनीने विहित कालावधीच्या ११ महिने आधीच तब्बल दोन हजार प्रहार लाईट मशिन गन पुरवठा केला आहे. प्रयोग करून अंतिम निर्मित करण्यासाठी सात वर्षांचा कालावधी देण्यात आला होता. पण कंपनीने सहा वर्ष आणि एक महिना या कालावधीत गनचा पुरवठा केला. नियोजनानुसार पुढील तीन वर्षांत लष्कराच्या मागणीनुसार पूर्ण पुरवठा केला जाणार असल्याची ग्वाही अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनीने दिला आहे. कंपनीकडे ४० हजार एलएमजीची ऑर्डर आली आहे. यापैकी दोन हजार गन लष्कराला मिळाल्या असून उर्वरित गनचा पुरवठा अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनी पुढील तीन वर्षांत करणार आहे.
प्रहार एलएमजीची प्रमुख वैशिष्ट्ये:
- पायदळ सैनिकांची लढण्याची क्षमता वाढवते
- ७.६२ मिमी कॅलिबरची प्रहार एलएमजी सैनिकांना वेगाने गोळीबार करण्याची आणि शत्रूवर दबाव निर्माण करण्याची संधी मिळवून देते.
- प्रहार एलएमजी ओपन-बोल्ट, गॅसवर चालणारी एलएमजी आहे, जिचे वजन ७.६ किलो आहे आणि धूळ व उष्णता यांसारख्या प्रतिकूल परिस्थितीत कार्यक्षमतेने काम करण्यासाठी तिची रचना केली आहे.
- ५०८ मिमी (वीस इंच) बॅरल आहे.
- फायर रेट प्रति मिनिट सहाशे ते साडेसातशे राउंड्स आहे.
- एलएमजी असॉल्ट ड्रम, बेल्ट चेन किंवा मॅगझिनला सपोर्ट करते.