भोंदूबाबा अशोक खरातप्रकरणात पुरावा आढळणाऱ्या प्रत्येकावर कारवाई

मुंबई : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात ज्या-ज्या व्यक्तीविरुद्ध पुरावा मिळेल, त्या प्रत्येकाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. तसेच खरातच्या शिवनिका संस्थानच्या कार्यकारी संचालक मंडळाची सखोल चौकशी सुरू असून, गैरकृत्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंधित असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.


मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी विधानसभेत या प्रकरणाविषयी सविस्तर निवेदन करत तपासाची सद्यस्थिती मांडली. ते म्हणाले, आतापर्यंत पाच पीडित महिलांचे जबाब नोंदवण्यात आले असून, एकूण आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी सात गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथक (एसआयटी) करत आहे, तर एक गुन्हा नाशिक क्राईम युनिटकडे आहे. हा अंतरिम अहवाल असून दररोज नव्या बाबी समोर येत असल्याचे त्यांनी सांगितले. आपण सगळे राजकारणात आहोत, त्यामुळे फोटो कुणासोबतही येऊ शकतो. मात्र, सध्या डिलिटेड डेटा अवगत करण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार, खरातचा कोणाशी संपर्क होता, कोणी मदत केली, त्या सर्वांवर कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


वावी (जि. नाशिक) पोलीस ठाण्यात २० डिसेंबर २०२५ रोजी अशोककुमार एकनाथ खरात यांच्या नावाने दाखल तक्रारीत व्हॉट्सॲपद्वारे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, प्राथमिक तपासात या तक्रारीस ठोस पुरावा मिळाला नाही. नीरज जाधव याच्या सहभागाबाबतही अद्याप ठोस पुरावा समोर आलेला नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.


यानंतर १८ फेब्रुवारी २०२६ रोजी शिर्डी येथे एका महिलेने एआय-निर्मित अश्लील फोटो पाठवून धमकी दिल्याची तक्रार केली. या तपासादरम्यान अशोक खरातशी संबंधित साक्षीदाराने पोलिसांना काही व्हिडिओ दाखवले. या व्हिडिओमध्ये आठ महिलांचे ३५ व्हिडिओ आढळून आले असून, त्यामध्ये जादूटोणा व भोंदूगिरीच्या माध्यमातून महिलांवर अत्याचार केल्याचे स्पष्ट झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. संबंधित साक्षीदाराला जीविताची भीती असल्याने तो सुरुवातीला पुढे येण्यास तयार नव्हता. पोलिसांनी संरक्षणाची हमी देऊन त्याच्याकडून हे व्हिडिओ जप्त केले, असे फडणवीस यांनी नमूद केले.

परदेशात पळून जाण्याचा होता कट


अशोक खरात परदेशात पळून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन दि. १० मार्च २०२६ रोजी लुकआउट नोटीस जारी करण्यात आली. त्यानुसार विमानतळ प्राधिकरणाने तत्काळ त्याच्या विदेश प्रवासावर बंदी घातली. त्यानंतर १३ मार्च रोजी एसआयटी स्थापन करून वावी व शिर्डी येथील गुन्ह्यांचा तपास एकत्रितपणे या पथकाकडे सोपवण्यात आला.


एका महिलेने १७ मार्च २०२६ रोजी सरकारवाडा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर प्रकरणाला निर्णायक वळण मिळाले. धार्मिक विधींच्या नावाखाली विश्वास संपादन करून, गुंगीकारक पदार्थ देत आणि धमक्या देत वारंवार बलात्कार केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला. त्यानंतर त्याच दिवशी रात्री अशोक खरात याला अटक करण्यात आली.


प्राथमिक तपासात त्याच्याकडून सहा लाख रुपयांची रोकड, दोन लॅपटॉप, डीव्हीआर, रिव्हॉल्वर, जिवंत आणि वापरलेली काडतुसे जप्त करण्यात आली. पुढील तपासात आणखी काही पीडित महिलांची ओळख पटवून त्यांचे समुपदेशन करण्यात येत असून, त्यांच्या फोटो-व्हिडिओंचे सोशल मीडियावरून निर्मूलन करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

शिवनिका संस्थानची चौकशी


या प्रकरणात शिवनिका संस्थानचीही चौकशी सुरू असून, त्याच्या कार्यकारी संचालक मंडळाचा तपास करण्यात येत आहे. आरोपी, पीडित महिला, तसेच संबंधित पुजारी आणि इतर व्यक्तींचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

खरातकडे किती संपत्ती?


अशोक खरातच्या एकूण संपत्तीविषयी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मिरगाव येथे ३३ एकर जमीन, पाथर्डी गाव १० एकर, नाशिक सिन्नर १० एकर, राहता अहिल्यानगर साडेचार एकर, काकडी तालुका शिर्डा विमानतळ ५.५ एकर जमीन, पाथर्डी फाटा येथे फ्लॅट, ओझरमध्ये पाच गुंठ्याचा प्लॉट, पनवेलमध्ये ४० गुंठे प्लॉट, कॅनडा कोर्ट नाशिक येथे १८० स्क्वेअर फूट ऑफिस, संगमनेरमध्ये मुलीच्या नावावर ८० गुंठे प्लॉट, पुण्यात मुलीच्या नावावर प्लॉट आहे. त्याशिवाय नाशिक कर्मयोगी नगरमध्ये बंगला, राहता येथे साई सिल्व्हर ओक मंगल कार्यालय, सिन्नरमध्ये पाच जणांमध्ये सहा एकर जमीन, मिरगावमध्ये फार्महाऊस, स्वत:कडे १२ तोळे सोने, पत्नीकडे २० तोळे सोने, पत्नीच्या नावे डीमॅट अकाऊंटवर एक ते दोन लाख गुंतवणूक, पाच बँक खात्यांमधील रक्कम मिळून ४० कोटी ८७ लाखांची संपत्ती आहे. यात आणखी वाढ होऊ शकते, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

नातेवाईकांची संपत्तीही तपासणार


अशोक खरातने त्याच्या नातेवाईंकांच्या नावावर तर संपत्ती घेतली नाही ना, याची चौकशी करण्यात येणार आहे. आरोपीच्या नातेवाईकांकडे असलेल्या मालमत्तेची माहिती घेत आहोत. आरोपीने कर चुकवेगिरी केली असेल, तर आयकर विभाग कारवाईसाठी पत्रव्यवहार करणार आहे. खरातसोबत वरिष्ठ अधिकाऱ्याने आर्थिक गैरव्यवहार केला का, याची चौकशी सुरू आहे. शिवनिका संस्थानच्या कार्याकारी संचालक मंडळाची सखोल चौकशी करण्यात येत आहेत. इतरही संस्था किंवा ट्रस्ट असेल, तर त्याची चौकशी केली जाईल. त्यातील कार्यकारी मंडळाची चौकशी करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Comments
Add Comment

Nashik : कांद्याच्या प्रश्नावर सरकार ॲक्शन मोडमध्ये ! दर घसरणीच्या अभ्यासासाठी उपसमिती गठीत

Nashik : कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे शेतकरी अडचणीत सापडले असताना आता राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये आल्याचं दिसत आहे.

West Asia War : पश्चिम आशियात तणाव पुन्हा वाढला: अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचे बहरीन आणि जॉर्डनमध्ये क्षेपणास्त्र-ड्रोन हल्ले

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणचे सैन्य पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. दोन्ही देशांनी पुन्हा एकदा

London Marathi Family Death : लंडनमध्ये मराठी दाम्पत्य आणि मुलाचा मृत्यू; तपासात समोर आली धक्कादायक माहिती

लंडन : ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये (London) एका मराठी कुटुंबाच्या मृत्यूची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भारतीय वंशाचे

Chhagan Bhujbal : राजकारणात काहीजण कष्ट न करताही पुढे जातात!

मंत्री छगन भुजबळ यांचा पक्षांतर्गत विरोधकांना टोला; राष्ट्रवादीच्या वर्धापनदिन कार्यक्रमात सूचक विधान मुंबई :

Jalgoan : जळगावात एफडीएची मोठी कारवाई ! २१ लाखांचा गुटखा जप्त

Jalgoan : जळगाव जिल्ह्यात अवैध गुटखा तस्करीविरोधात ( Illegal gutka smuggling) अन्न व औषध प्रशासनाने मोठी धाडसी कारवाई केले आहे. या

मोदी युगाचा नवा अध्याय; नरेंद्र मोदी ठरले भारताचे सर्वाधिक काळ सलग कार्यरत पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारणात आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. 10 जून रोजी सलग