नवी दिल्ली : प्रतिकूल हवामानामुळे देशातले काजू उत्पादन ६० टक्के घटण्याची भीती व्यक्त होत आहे. शाला कच्च्या काजूचा पुरवठा करणाऱ्या प्रमुख आफ्रिकी देशांनी कच्चा काजू निर्यात न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशातील काजू प्रक्रिया उद्योग अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. देशातील एकूण काजू प्रक्रिया उद्योगापैकी ४० टक्के उद्योग महाराष्ट्रात असल्यामुळे मोठा फटका राज्यातील काजू प्रक्रिया उद्योगाला बसणार आहे.
मान्सूनच्या २०२५ च्या वेळापत्रकात बदल झाल्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस पडत होता. पश्चिम किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यामुळे काजूचा मोहोर गळून गेला. उर्वरीत मोहोर बुरशी आणि अति आर्द्रतेमुळे कुजला. नंतर अनेक टप्यात मोहोर आला. पण, अति थंडी, दुपारचे वाढलेले तापमान, बुरशी आणि तुडतुड्यांमुळे फळधारणा झाली नाही. यामुळे एकूण काजू उत्पादनात ५० ते ६० टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती व्यक्त होत आहे.
देशांतर्गत काजू उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज असतानाच देशाला दर्जेदार कच्च्या काजूचा पुरवठा करणाऱ्या घाना, आयव्हरी कोस्ट, बेनिन, टांझानिया सारख्या प्रमुख आफ्रिकी देशांनी देशांतर्गत काजू प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी, रोजगार निर्मितीसाठी कच्च्या काजूच्या निर्यातीव निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे प्रक्रिया उद्योगाला काजूचा मोठा तुटवडा जाणवण्याची धोका वाढला आहे.
भारताची काजू प्रक्रिया क्षमता १६ लाख टन आहे. त्यापैकी ५० टक्के काजू देशात उत्पादित होतो तर साधारण तेवढाच काजू प्रामुख्याने आफ्रिकेतील देशांतून भारतात आयात केला जातो. पण यंदा (२०२६) देशांतर्गत काजू उत्पादन ४० टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. प्रमुख आफ्रिकी निर्यातदार देशांनी कच्च्या काजूच्या निर्यातीवर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे देशातील काजू प्रक्रिया केंद्रांना काजूचा तुटवडा जाणविणार आहे.
देशाच्या एकूण काजू प्रक्रिया क्षमतेपैकी ४० टक्के काजू प्रक्रिया उद्योग राज्यात आहे. यामुळे राज्यातील काजू प्रक्रिया केंद्रे अडचणीत येणार आहेत. महाराष्ट्र राज्य काजू मंडळाने या संभाव्य संकटाची दखल घेतली आहे. काजू मंडळ दीर्घकालीन उपाययोजना हाती घेणार आहे. नैसर्गिक, सेंद्रीय शेतीद्वारे काजूच्या झाडांची रोग प्रतिकारक क्षमता, उत्पादन क्षमता वाढविण्याचे नियोजन आहे.
यंदा कोकणात कच्च्या काजू बियांची खरेदी १७० ते १८० रुपयांनी सुरू आहे. कच्च्या काजू बियांना आतापर्यंत मिळालेला हा सर्वाधिक दर आहे.
परिस्थिती सुधारली नाही तर प्रक्रिया केंद्रांना स्थानिक काजू गणेशोत्सवापर्यंत पुरेल. तोपर्यंत आफ्रिकी देशांतून काजू आला नाहीतर तुटवडा जाणवेल. यंदा दिवाळीच्या काळात काजूचा मोठा तुटवडा जाणवू शकतो. काजूचे दर १५०० रुपये किलोपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.