Sunday, April 12, 2026
Nari Shakti Vandan

शाहरुख, सलमानला भेटा, ५० रुपयांत वांद्रयात फिरा

शाहरुख, सलमानला भेटा, ५० रुपयांत वांद्रयात फिरा

सध्या सगळीकडेच महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे अनेकांना वाटतं की मुंबईत फिरणं म्हणजे आपल्याला काही परवडणार नाही. पण, आपण मुंबईत कमी पैशातच अनेक भारी ठिकाणांना भेट देऊ शकतो याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे.

चला तर जाणून घेऊयात याबद्दल.

केवळ 50 रुपयांमध्ये तुम्ही हा प्रवास करू शकता. जर तुम्ही बोरिवलीहून निघत असाल तर बोरिवली ते बांद्रा लोकल ट्रेनचं रिटर्न तिकीट साधारण २० रुपये आहे. तसेच, तुम्ही विरार–चर्चगेट या वेस्टर्न लाईनवरून बांद्रा स्टेशनला पोहोचू शकता.

बांद्रा स्थानकावर उतरल्यावर पश्चिमेकडे बाहेर पडल्यानंतर. स्टेशनसमोरच बसस्थानक आहे. येथून २१२ क्रमांकाची बस थेट बँडस्टँडकडे जाते, या बसचे तिकीट साधारण १० ते १२ रुपये आहे. या प्रवासात २० ते २४ रुपये खर्च होतो. म्हणजेच रेल्वे आणि बस असा पूर्ण प्रवास एकूण ५० रुपयांच्या आत होणार आहे.

तुम्ही ‘सेंट अँड्र्यूज चर्च’ स्टॉपला उतरल्यावर उजव्या बाजूला समोर पसरलेला सुंदर असा समुद्रकिनारा असून या ठिकाणी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचं ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’ दिसतं.

तेथूनच ५ ते १० मिनिटं चालत पुढे गेल्यानंतर अभिनेत्री बबिता कपूर यांचा बंगला पाहायला मिळतो. तेथेच एका उंच इमारतीच्या टॉप फ्लोअरवर अभिनेता जॉन अब्राहमचं घर असून थोडं पुढे गेल्यावर अभिनेत्री रेखाचा जुना ‘बसेरा’ बंगलाही या ठिकाणी पाहायला मिळणार आहे.

तेथूनच थोडं पुढे गेलं की बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा ‘मन्नत’ बंगलाही पाहायला मिळतो. बॉलिवूड सिनेस्टार्सची घरं पाहिल्यानंतर पुढे भव्य ताज लँड्स एंड हॉटेल आहे. त्याच्या बाजूला ऐतिहासिक परिसर वांद्रा किल्लाही पाहायला मिळतो.

Comments
Add Comment