मला शिकायचंय...

कथा : रमेश तांबे


सुरज एक शाळकरी मुलगा होता. हातात पिशवी नाही की खिशात पैसे नाहीत. बाबांच्या टोचून बोलण्याचा त्याला प्रचंड राग आला होता. त्यामुळे रागारागात तो रेल्वेत बसला आणि निघाला दूर कुठेतरी. एका मागून एक स्टेशन्स मागे पडत होती. त्याला झोप लागली अगदी गाढ. कुणीतरी तिकीट तिकीट असं ओरडलं तेव्हा तो जागा झाला. त्याने डोळे उघडले तर समोर काळ्या कोटातला टी.सी. उभा. सुरजने तिकीट नाही असं म्हणताच टी.सी. म्हणाला, “पाचशे रुपये” दंड भरावा लागेल. पण सुरजकडे पाचशे रुपये काय पाच पैसेदेखील नव्हते.


पुढचे स्टेशन येताच टी.सी.ने सुरजला स्टेशन मास्तरांच्या कार्यालयात नेले. तेव्हा साहेब म्हणाले, “काय रे कुठून पकडून आणलेस या मुलाला.” साहेब या मुलांना फुकट फिरायची सवय असते. याला योग्य ती शिक्षा मिळालीच पाहिजे. साहेबाने मुलाकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावरचे करूण भाव बघून त्यांच्या हृदयात कालवाकालव झाली. या मुलाचं काय करायचं ते तुम्हीच ठरवा साहेब असं म्हणून टी.सीं.नी त्यांचा निरोप घेतला. इतका वेळ सुरज मान खाली घालून उभा होता. आता साहेब जागेवरून उठले आणि सुरजला एका बाकड्यावर बसवून ते स्वतः त्याच्या शेजारी बसले. डोक्यावर हात फिरवत त्याच्या डोळ्यांत पाहत म्हणाले, “काय रे मुला तुझं नाव काय? एकटाच कुठे निघालास? कुठून आलास?” साहेबांच्या प्रश्नांची मालिका काही संपत नव्हती.


“काका माझं नाव सुरज महादेव सुर्वे. वय १५, राहणार मुंबई. काल बाबांचं आणि माझं खूप भांडण झालं. मला त्यांनी मारलं. नको नको ते बोलले. आईसुद्धा गप्पच होती. मग ठरवलं घर सोडून निघून जायचं. वाट मिळेल तिथं.” साहेब म्हणाले, “अरे सुरज, असा राग नाही घालून घ्यायचा डोक्यात. तू मला तुझा पत्ता सांग, मी तुला परत पाठवण्याची व्यवस्था करतो.” सुरज म्हणाला, “पण काका मला नाही जायचं घरी. माझं बाबांशी भांडण झालंय.” “अरे, पण मग काय झालं. ते तुझे बाबा आहेत. ते नक्कीच तुला माफ करतील. शिवाय तुझी आई रडून रडून थकली असेल रे बाळा” मग सुरज सांगू लागला, “पण घरी जाऊन करू तरी काय. बाबांनी स्वतःच मला शाळेतून काढून टाकलंय. खरं तर मला खूप शिकायचंय पण बाबा म्हणतात शिकून काय करायचं. त्यापेक्षा काम कर!”


साहेबांच्या लक्षात आलं. पोराला शाळेत जायचंय, शिकून मोठं व्हायचंय. बाबांनी शाळेत जायचं नाही असं म्हटल्यामुळेच हा रागावलाय बाबांवर. ते म्हणाले, “घाबरू नकोस. मी तुझ्या शिक्षणाची जबाबदारी घेतो. तुझा सर्व खर्च मी करीन. मग तर झालं.” या एका अटीवर सुरज घरी जायला तयार झाला. मग साहेब दुसऱ्या दिवशी स्वतः सुरजला घेऊन त्याच्या घरी गेले. सुरजला पाहताच बाबांच्या डोळ्यांत पाणी आलं, आई त्याला कुशीत घेऊन रडू लागली. साहेब म्हणाले, “बघा, सुरज हा खूप गुणी मुलगा आहे. त्याला शिकू द्या. तुम्हाला शक्य नसेल तर मी त्याच्या शिक्षणाचा सर्व खर्च करेन.” हे सांगताच सुरजचे आई-बाबा हमसून हमसून रडू लागले. साहेब जाता जाता म्हणाले, “पोराला सांभाळा. मी माझ्या मुलाला तीस वर्षांपूर्वी असंच गमावलंय.” असं म्हणत त्यांनी खिशातल्या रुमालाने आपले अश्रूंनी डबडबलेले डोळे पुसले अन् तेथून निघाले.

Comments
Add Comment

समुद्रात बेटे कशी तयार झाली?

विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील   मंदिरात शिवम मित्र गटाच्या ज्ञान विज्ञानाच्या गोष्टी खूपच वाढत होत्या. “मग

फक्त पुस्तकी पंडित बनू नका

गोष्ट लहान, मोठा अर्थ-शिल्पा अष्टमकर   ज्ञान हे माणसाच्या जीवनाला दिशा देणारे सामर्थ्य आहे; परंतु केवळ पुस्तके

दिसतं ते विकतं

प्रतिभारंग-प्रा. प्रतिभा सराफ   व्हिएतनामला एका थ्रीडी फोटो म्युझियमला भेट दिली होती. तिथे गेल्यावर अगदी

राजकन्या

कथा-रमेश तांबे   एक होती राजकन्या. राजाची एकुलती एक मुलगी! तिला ना भाऊ होता, ना बहीण! एवढ्या मोठ्या राजवाड्यात

चांगल्या वागण्यातून घडते चरित्र

गोष्ट लहान, मोठा अर्थ-शिल्पा अष्टमकर   “माणसाच्या आयुष्यात ज्ञान, संपत्ती, पद किंवा प्रसिद्धी यांना महत्त्व

स्वातंत्र्याची किंमत...

कथा-रमेश तांबे   एक होतं माकड. अंगानं होतं राकट. एका जंगलात राहायचं, ताजी ताजी फळं खायचं. झाडावर राहायचं, झाडावरच