T20 क्रिकेटमध्ये भारत तिसऱ्यांदा विश्वविजेता, यजमान भारताने घरच्या मैदानावर जिंकला वर्ल्डकप

विश्वविजेता भारत, फायनलमध्ये ९६ धावांनी विजय


अहमदाबाद  : अहमदाबादच्या जगातल्या सगळ्यात मोठ्या स्टेडियमवर सव्वा लाख चाहत्यांच्या साक्षीने भारतीय संघाने दणदणीत वर्चस्वासह टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम लढतीत न्यूझीलंडचा धुव्वा उडवत जेतेपदावर नाव कोरले. २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने जेतेपदाची कमाई केली होती. आतापर्यंत कोणत्याच संघाला जेतेपद कायम राखता आले नव्हते. दोन वर्षांपूर्वी रोहितसेनेचा भाग असणाऱ्या सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने अंतिम मुकाबल्यात प्रथम फलंदाजी करताना २५५ धावांचा डोंगर रचला. संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि इशान किशन या आघाडीच्या शिलेदारांनी वादळी अर्धशतकी खेळी साकारत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. या डोंगरासमोर खेळताना न्यूझीलंडने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. तिलक वर्माने लॉकी फर्ग्युसनचा झेल घेताच खेळाडूंनी एकच जल्लोष केला. न्यूझीलंडचा डाव १५९ धावांतच आटोपला.


अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. सलामीवीर अभिषेक शर्माने अवघ्या २१ चेंडूंत ५२ धावांची (६ चौकार, ३ षटकार) स्फोटक खेळी करत पॉवरप्लेमध्ये भारताला ९२ धावांपर्यंत मजल मारून दिली. त्यानंतर संजू सॅमसनने आपल्या फॉर्मचे सोने करत ४६ चेंडूंत ८९ धावांची (५ चौकार, ८ षटकार) मॅरेथॉन खेळी केली. त्याला इशान किशनने (२५ चेंडूंत ५४ धावा) मोलाची साथ दिली. अखेरच्या षटकात शिवम दुबेने ८ चेंडूंत २६ धावा कुटल्यामुळे भारताने २० षटकांत ५ बाद २५५ धावांचे हिमालयासारखे लक्ष्य न्यूझीलंडसमोर ठेवले. २५६ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. जसप्रीत बुमराहने आपल्या ४ षटकांत केवळ १५ धावा देत ४ बळी टिपले आणि किवींच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. फिरकीपटू अक्षर पटेलने २७ धावांत ३ महत्त्वाचे मोहरे टिपून त्याला उत्तम साथ दिली. न्यूझीलंडकडून केवळ टिम सीफर्टने (२६ चेंडूंत ५२ धावा) थोडा प्रतिकार केला, मात्र इतर फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीसमोर नांगी टाकली. डॅरिल मिचेल (१७) आणि मिचेल सँटनर (४३) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण वाढत्या धावगतीचा दबाव त्यांना सोसता आला नाही. संपूर्ण न्यूझीलंडचा संघ १९ व्या षटकात १५९ धावांवर गारद झाला.


न्यूझीलंडचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय


न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या कारण मोठ्या लढतींमध्ये नाणेफेक जिंकून फलंदाजी पत्करावी, मोठी धावसंख्या रचावी आणि त्याचा बचाव करावा असं धोरण कर्णधार अवलंबतात. सँटनटरने वेगळा विचार करत गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने फायनलसाठी ऑफस्पिनर कोल मॅकहोनीऐवजी वेगवान गोलंदाज जेकब डफीचा संघात समावेश केला. भारतीय संघाने वरुण चक्रवर्तीवर विश्वास ठेवत त्याला अंतिम अकरात कायम राखले.


शिवम दुबेचा 'फिनिशिंग' टच


टी-२० क्रिकेटमध्ये शिवम दुबेची भूमिका अतिशय महत्वाची ठरते. इंग्लंडविरूद्ध झालेल्या सामन्यात त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन ४३ धावांची वादळी खेळी केली होती. न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात त्याला सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याची संधी मिळाली. शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजी करताना त्याने ८ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने नाबाद २६ धावांची खेळी केली.


बुमराहच्या वेगाची जादू


फलंदाजांनी आपले काम योग्यरित्या पूर्ण केले होते. त्यामुळे सर्व जबाबदारी गोलंदाजांवर होती. आव्हान मोठं होतं. पण न्यूझीलंडच्या ताफ्यातही एकापेक्षा एक स्फोटक फलंदाज होते. त्यांना लवकर बाद केलं नसतं. तर टीम इंडियाचं टेन्शन वाढलं असतं. त्यामुळे सूर्यकुमार यादवने जसप्रीत बुमराहला लवकर गोलंदाजीला बोलवलं. बुमराहने पहिल्याच चेंडूवर रचिन रवींद्रला बाद करत माघारी धाडलं. बुमराहने या सामन्यात गोलंदाजी करताना ४ षटकात १५ धावा खर्च करून ४ गडी बाद केले.


संजू-अभिषेकचा शानदार शो!


भारताचे सलामीवीर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या जोडीने इतिहास घडवला आहे. भारताने नाणेफेक गमावली असली तरी संघाला प्रथम फलंदाजी करायची होती. टीम इंडियाचा हा निर्णय अगदी योग्य ठरला. संजू सॅमसन व अभिषेक शर्माच्या जोडीने २४ चेंडूंत ५० धावांची भागीदारी केली. टी-२० विश्वचषक अंतिम सामन्याच्या इतिहासात पहिल्यांदाच हा पराक्रम करण्यात आला. यापूर्वी, २००७ ते २०२४ पर्यंत, कोणत्याही सलामी जोडीने अंतिम सामन्यात पन्नासपेक्षा जास्त सलामीची भागीदारी केली नव्हती.


अंतिम सामन्यात अभिषेक चमकला


अंतिम सामन्यात फलंदाजी करताना अभिषेक शर्माने अवघ्या १८ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत सर्वात जलद अर्धशतकी खेळी करणारा फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम जेकब बेथेल आणि फिन अॅलेनच्या नावावर होता. दोघांनी १९ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं होतं. या दमदार अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने पावरप्लेमध्ये ९२ धावा केल्या.


सॅमसनची विक्रमाला गवसणी


संजू सॅमसनला या स्पर्धेतील काही मोजकेच सामने खेळण्याची संधी मिळाली. पण या सर्व सामन्यांमध्ये संजू सॅमसनने आपली छाप सोडली. वेस्ट इंडिजविरूद्ध झालेल्या सुपर ८ फेरीतील शेवटच्या सामन्यात नाबाद ९७ धावांची खेळी केली होती. त्यानंतर इंग्लंडविरूद्ध झालेल्या सेमी फायनलच्या सामन्यात त्याने ८९ धावांची खेळी केली होती. या दोन्ही सामन्यात त्याला शतक झळकावण्याची संधी होती. पण ही संधी थोडक्यात हुकली होती. अंतिम सामन्यातही त्याला शतक झळकावण्याची संधी होती. पण ८९ धावांवर फलंदाजी करत असताना मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो बाद होऊन माघारी परतला. हे त्याचे या स्पर्धेतील लागोपाठ तिसरे अर्धशतक ठरले. तसेच तो टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील पावरप्लेमध्ये फलंदाजी करताना सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने या स्पर्धेतील पावरप्लेमध्ये फलंदाजी करताना १० हून अधिक षटकार मारले आहेत.


अक्षर पटेलची सुवर्ण कामगिरी


अक्षर पटेल हा भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयाचा खरा अनसंग हिरो ठरला. गेल्या सामन्यात २ भन्नाट कॅच पकडून भारताचा विजय खेचून आणणाऱ्या अक्षरला या सामन्यात फलंदाजीला येण्याची संधी मिळाली नाही. पण गोलंदाजी करताना त्याने न्यूझीलंडला लागोपाठ धक्के दिले. आधी फिन अॅलेनला अवघ्या ९ धावांवर झेलबाद करून माघारी धाडलं. त्यानंतर ग्लेन फिलिप्सची दांडी गुल केली. अक्षरने या सामन्यात ३ गडी बाद केले.


भारताचा नादच खुळा


अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघाला वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला होता. या स्पर्धेत भारताला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पण ऑस्ट्रेलियाने जेतेपदाचे स्वप्नभंग केले होते. पण याच मैदानावर न्यूझीलंडविरूद्ध टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे. यासह जेतेपदाच्या दिशेने मजबूत पाऊल टाकलं आहे. या सामन्यात भारतीय संघाने मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. न्यूझीलंडविरूद्ध सुरू असलेल्या टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना २० षटकांअखेर ५ गडी बाद २५५ धावांचा डोंगर उभारला आहे. ही या स्पर्धेच्या इतिहासातील अंतिम सामन्यात कुठल्याही संघाने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधी भारतीय संघाने २०२४ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळताना ७ गडी बाद १७६ धावा केल्या होत्या. आता भारताने २५० हून अधिक धावा करून आपलाच रेकॉर्ड मोडून काढला आहे.


कर्णधार सूर्याच्या कृतीने जिंकली मने


भारताने टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात विक्रमी धावसंख्या उभारली. टीम इंडियाने न्यूझीलंड संघाला विजयासाठी २५६ धावांचं डोंगराएवढं मोठं लक्ष्य दिलं आहे. पण भारताच्या गोलंदाजांनी मात्र न्यूझीलंडच्या टॉप फलंदाजी फळीला झटपट गुंडाळलं आणि विजयाच्या दिशेने अग्रेसर झाले. यादरम्यान अर्शदीप सिंग व डॅरिल मिचेल यांच्यात मैदानावर वाद झाला. पण यानंतर सूर्यकुमार यादवच्या कृतीने मात्र सर्वांचं मन जिंकलं. अर्शदीप सिंग सामन्यातील ११वं षटक टाकण्यासाठी आला. त्याच्या दुसऱ्याच चेंडूवर डॅरिल मिचेलने षटकार खेचला. यानंतर पाचव्या चेंडूवर अर्शदीपने टाकलेला चेंडू मिचेलने अर्शदीपच्या दिशेने खेळला आणि स्टंप सोडून लांब होता. तितक्यात अर्शदीपने चेंडू स्टंपवर मारला, हे पाहताच मिचेल लगेच त्याची बॅट मैदानावर ठेवण्यासाठी पुढे आला आणि त्यामुळे अर्शदीपने मारलेला चेंडू मिचेलच्या मांडीला लागला. मिचेलला चेंडू लागताच तो वैतागला आणि अर्शदीपने तितक्यात चेहरा फिरवला. संतापलेला मिचेल अर्शदीपच्या दिशेने मागून हातवारे करत चालत आला. पंचांकडेही त्याने मोठ्याने ओरडत तक्रार केली. पण अर्शदीप मात्र मागे न पाहता पुढे चालत गेला. त्यानंतर पुढचा चेंडू तो खेळला. अर्शदीपचं षटक संपल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव डॅरिल मिचेलजवळ गेला आणि त्याने हात मिळवत मिचेलची समजूत काढली. सूर्याच्या या कृतीने सर्वांची मनं जिंकली आहेत. यानंतर अर्शदीप सिंगनेही मिचेलची भेट घेतली आणि वाद मिटवला.


थोडक्यात धावफलक:
भारत: २५५/५ (संजू सॅमसन ८९, ईशान किशन ५४, जिमी नीशम ३/४६)
न्यूझीलंड: १५९/१० (टिम सायफर्ट ५२, जसप्रीत बुमराह ४/१५, अक्षर पटेल ३/२७)
निकाल: भारत ९६ धावांनी विजयी.

Comments
Add Comment

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून

ICC bans UAE batter : आयसीसीची युएईचा फलंदाज आसिफ खानवर १५ महिन्यांची बंदी

दुबई : संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) अनुभवी फलंदाज आसिफ खान याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) डोपिंग

India U19 Squad : ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारताचा १९ वर्षांखालील संघ जाहीर; सेहवाग-द्रविडच्या मुलांना संधी

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाच्या भारत दौऱ्यासाठी भारतीय १९ वर्षांखालील संघाची घोषणा

Dean Elgar Retirement : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गरने घेतली व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि अनुभवी कसोटी सलामीवीर डीन एल्गरने (Dean Elgar Retirement) व्यावसायिक

IND vs SL 2nd Test Day 5 : भारताला हव्यात ४ विकेट्स, पण पावसामुळे विजय हुकणार? कोलंबोत हवामानाचा मोठा धोका

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना निर्णायक

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या