Women's Day : जागतिक महिला दिनानिमित्त राज्यात ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ

- आरोग्य क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान


मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ८ मार्च रोजी महिला सक्षमीकरण आणि आरोग्य संरक्षणासाठी राज्यभरात विविध महत्त्वपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ करण्यात येत आहे. महिलांच्या आरोग्य हक्कांना बळ देत गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी १४ वर्षे पूर्ण झालेल्या परंतु १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींसाठी राज्यव्यापी ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ, होत आहे. या दिवशी आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान देखील करण्यात येणार आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) व आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या पुढाकाराने हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम रविवार, ८ मार्च २०२६ रोजी मुख्य सभागृह, यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॅाईट, मुंबई येथे दुपारी ३.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.



राज्यव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ :


गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी राष्ट्रीय ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) लसीकरण मोहिमेचा राज्यव्यापी शुभारंभ महिला दिनानिमित्त होत आहे. १४ वर्षे पूर्ण झालेल्या परंतु १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना ‘गार्डसिल-४’ या लसीचा एक मोफत डोस देण्यात येणार आहे. राज्यातील एकूण ९ लाख ८४ हजार ४१४ मुलींना या मोहिमेचा लाभ मिळणार असून लसीकरण पूर्णपणे मोफत व पालकांच्या संमतीने ऐच्छिक स्वरूपात होणार आहे.


भारतामध्ये महिलांमधील कर्करोगांमध्ये गर्भाशयमुखाचा कर्करोग दुसऱ्या क्रमांकावर असून दरवर्षी सुमारे ८० हजार नवीन रुग्ण आढळतात व ४२ हजारांहून अधिक मृत्यू होतात. एचपीव्ही प्रकार १६ व १८ पासून संरक्षण देणारी ही लस अत्यंत प्रभावी मानली जाते. ही मोहीम सलग तीन महिने विशेष अभियान म्हणून राबविण्यात येणार असून त्यानंतर ती नियमित लसीकरण कार्यक्रमाचा भाग होईल. प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, महानगरपालिका रुग्णालये व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लसीकरण केले जाईल. सर्व लाभार्थ्यांची नोंदणी व प्रमाणपत्र वितरण केंद्र शासनाच्या U-WIN या डिजिटल पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे.



आरोग्य क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव :


जागतिक महिला दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिला डॉक्टर्स, स्त्रीरोग तज्ज्ञ, स्त्री शल्यचिकित्सक, परिचारिका, आरोग्य सेविका, आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकार यांचा सन्मान करण्यात येणार आहे. ग्रामीण व दुर्गम भागात मातृत्व, बाल आरोग्य, कर्करोग प्रतिबंध आणि जनजागृती मोहिमांमध्ये त्यांनी बजावलेल्या भूमिकेचा विशेष गौरव करण्यात आला.महिला सक्षमीकरण, स्त्री-पुरुष समानता आणि आरोग्य हक्कांविषयी जनजागृती करण्यासाठी हे उपक्रम प्रेरणादायी ठरणार असून “महिलांच्या स्वप्नांना बळ देऊया, उद्याचे उज्ज्वल भविष्य घडवूया!” या संदेशाला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारे ठरतील, असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

Mumbai : जो पुरस्कार मिळवण्याचे स्वप्न बघितले तोच पुरस्कार देणारे हात झाले

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते समाजातील ४४ महिलांचा गौरव मुंबई (विशेष प्रतिनिधी) : क्षेत्र कोणतेही

Ashwini Bhide : पहिल्या महिला मुंबई महापालिका आयुक्त म्हणून आश्विनी भिडे यांनी स्वीकारला पदभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर ज्येष्ठ सनदी अधिकारी आश्विनी भिडे

Mahavir Jayanti : 'जागतिक अस्थिरतेच्या काळात महावीरांचा अहिंसेचा मार्गच मानवतेला तारू शकतो'

मुंबई : जागतिक पातळीवर वाढत असलेल्या युद्धजन्य परिस्थिती, हिंसा आणि असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर भगवान

Lokesh Chandra Additional Chief Secretary : लोकेश चंद्रा मुख्यमंत्र्यांचे नवे अतिरिक्त मुख्य सचिव

मुंबई : राज्याच्या प्रशासनात वरिष्ठ स्तरावर मंगळवारी मोठे फेरबदल करण्यात आले असून, १० सनदी अधिकाऱ्यांच्या

kurla bus accident : कुर्ला बस दुर्घटना प्रकरणातील आरोपी बस चालकाला जामीन

मुंबई: सव्वा वर्षापूर्वी कुर्ला पश्चिम येथे बेस्टचा भीषण अपघात झाला होता. या अपघात दुर्घटनेतील आरोपी चालक संजय

Maharashtra : महाराष्ट्रात १६ मेपासून जनगणना, देशात प्रथमच डिजिटल पद्धतीचा वापर

मुंबई : २०२७ च्या जनगणनेचे वेळापत्रक देशव्यापी जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे ते