लोलक

आशय : वीणा सानेकर


ज्ञानपीठ पारितोषिक विजेते विनोदकुमार शुक्ल यांनी दोनेक महिन्यांपूर्वी जगाचा निरोप घेतला. कवीची कविता त्याच्या जाण्यानंतर जगात उरते. महाविद्यालयीन जीवनात डॉ अनंतराम त्रिपाठी, डॉ बंशीधर पंडा यांच्यासारखे शिक्षक लाभले आणि हिंदी साहित्याचाही लळा लागला. ‘जे न देखे रवी ते देखे कवी”, असे म्हणतात नि ते खरेच आहे. शुक्ल यांच्या कवितेतून जाणवते की स्वतःच्या प्रतिभेची खिडकी खुली असणारा कवीच जग समजून घेऊ शकतो. हे जग कवी भोवतालचे असतेच पण त्यापलीकडले पाहण्याची त्याची धडपड असते.


‘वाचवून ठेवायला हवी हवा
श्वास घेण्यासाठी !’ ही त्यांची कविता आयुष्याचा जमाखर्च मांडणारी नि म्हणून प्रश्न विचारत राहणारी आहे.
“घटत घटत आयुष्य इतकेच उरले आहे.
आयुष्यभर लढण्यासाठी
आयुष्य किती आणि कसं वाचवलं पाहिजे…?”
जे जे नैसर्गिक आदिम आहे, ते ते वाचवणे, टिकवून ठेवणे, जपणे कवीला मौल्यवान वाटते. यातूनच जंगलाशी नाते जुळलेले आदिवासी आणि त्यांच्या आयुष्यातले कारुण्य कवीचे अंतःकरण हलवून टाकते. ‘जंगल के उजाड में’ नावाची त्यांची कविता अशी आहे:
ओसाड जंगलात
कांदा खोदता खोदता भुकेने बेशुद्ध पडलेल्या आदिवासींकरता कोण डॉक्टरला बोलवणार ?
त्याला इस्पितळात न्यायला हवे की स्वयंपाकघरात!
इथे दूरपर्यंत कुठले
इस्पितळ नाही
दूर -दूरपर्यंत अशी
झोपडी नाही,
जिथे चूल पेटते.
भुकेने बेशुद्ध पडलेल्या माणसाला कोणते प्राथमिक उपचार करायला हवेत ?
बेशुद्ध अवस्थेत वाटेल की आता झोपला आहे आणि त्याला झोपू दे.
बेशुद्धीत मेला तर कसे समजेल की मेला आहे आणि आता काही नाही होऊ शकत.
जर तो मेला तर मडक्यात त्याच्या वाट्याचा जरासाही भात नव्हता, जो दुसऱ्यासाठी उरेल.
दूर एखाद्या झाडाखाली किंवा झोपडीत
त्याची बायको आणि तीन मुले भुकेने मरणाऱ्या त्या माणसाची वाट पाहत असतील की तो कांदे खोदून आणेल कधीतरी… ..
… मग एकदा तीही भुकेने
मरून जातील.
काही दिवसांपासून ऐकिवात असलेली ही एक आदिवासी कथा आहे की खूप वर्षांपासून
जंगलात खूपसे आदिवासी भुकेने मरून जातात !
ही कविता वाचताना जंगले नि वनांचे राखणदार असणारे खरे भूमिपुत्र भुकेच्या आगीत होरपळून मरण्याचे दुःखद वास्तव खूप अस्वस्थ करते.
आदिवासींप्रमाणेच मजूरही त्यांच्या वाट्याला आलेले दुःख सोसत राहतात. त्यांच्या ‘मजदूरो, उस तरफ चलो’ या कवितेत मजुरांच्या आयुष्याचे वास्तव चित्रित झाले आहे. ना त्या मजुरांच्या खिशात पगार मिळाला की नाही अजून ? हे विचारणारी आणि आपल्या दुःखांचे वर्णन करणारी पत्रे आहेत. ना त्यांच्या हातात रिकामी झोळी आहे. विडी माचिसही नाही त्यांच्या उलट्या केलेल्या खिशांत. असलेले पाच पन्नास पैसेही त्यांनी देऊन टाकले आहेत, त्या दुकानदारांना, ज्यांची उधारी बाकी होती कधीपासून. हत्यारबंद पोलिसांच्या दिशेने चाललेल्या या निःशस्त्र मजुरांना कोणत्याही अपराधाविना गोळ्या झेलाव्या लागणार आहेत.
सर्वांना सर्व काही समान मिळावे, ही गोष्ट समाजात विविध टप्प्यांवर दुर्मीळ होत गेली. त्यांच्या एका कवितेत समाजातील भेदाभेदांच्या भिंतींचा स्पष्ट उद्गार उमटला आहे . “अपने हिस्से में लोग आकाश देखते हैं” या कवितेचा आशय समजून घेताना त्याचे पैलू अनेक वाटांनी मनाला भिडत राहिले. विनोदकुमार शुक्ल या कवितेत म्हणतात,
“लोक आपल्या वाट्याचे आकाश पाहतात आणि पूर्ण आकाश पाहतात. आपल्या वाट्याचा चंद्र पाहतात आणि पूर्ण चंद्र पाहतात. सगळ्यांच्या वाट्याचा कसा -बसा श्वास सगळेच घेतात.. घरातल्या बागेत वर्तमानपत्र वाचणारा आणि घाण आणि दुर्गंधीने भरलेल्या वातावरणात जिवंत असलेलाही! पण सर्वांच्या वाट्याला समान हवा येत नाही. आपल्या वाट्याची भूक शमवायला प्रत्येकाला त्याच्या वाट्याचे सगळे धान्य मिळत नाही.”


या कवितेचा शेवट अक्षरशः स्तब्ध करतो. “ जी सगळ्यांच्या घड्याळात दिसते, ती वेळ सगळ्यांच्या वाट्याची नसते.”
कवी काळाची स्पंदने आपल्या शब्दांतून पकडतो. काळाच्या आवाजाने कवितेचा गाभारा भारून टाकतो. प्रत्येक काळात त्याची कविता जिवंत राहते, फक्त तिचा आशय वाचण्याचा लोलक आपल्याला वेळेवर सापडायला हवा.

Comments
Add Comment

Majhi Kanya Bhagyashree Yojana : ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेचे फायदे ऐकूनही तुम्ही चकीत व्हाल

Majhi Kanya Bhagyashree Yojana : राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून

Ramai Awas Yojana : घर बांधायला पैसे नाहीत ? मग काळजी कशाला ? 'रमाई आवास' घरकुल योजना आहे ना !

Ramai Awas Yojana : राज्य सरकारने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘रमाई आवास (घरकुल) गृहनिर्माण योजना’ सुरू केली

Luck : चंगळता !

आमचे एक स्नेही आहेत. अगदी खेड्यात बालपण गेलेले असताना स्वकर्तृत्वाने शिक्षण घेतले, शिष्यवृत्त्यांवर शिकून

Lazy Pallu : उन्हाळ्यात वाढली ‘लेझी पल्लू’ची क्रेझ

एकेकाळी साडीचा पदर अगदी चापून-चोपून, नीट प्लेट्स घालून पिनअप करणं हीच एलिगंट फॅशन मानली जायची. पण बदलत्या

Kajuli biswas : संघर्ष आणि नि:स्वार्थ सेवेची कहाणी : काजुली विश्वास

पश्चिम बंगालच्या काजुली विश्वास यांनी गरिबी, उपासमार, बेघरपणा आणि आपल्याच लोकांची उपेक्षा सहन केली, पण या

Abhilasha Barak : मेजर अभिलाषा बराक यांना 'मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर' पुरस्कार

भारतीय लष्करातील धडाडीच्या महिला अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांनी आपल्या कर्तृत्वाने जागतिक पातळीवर देशाचे नाव