व्हॅलेंटाईन डे

प्रेमाचा प्रश्न, की संस्कृतीची परीक्षा?



संवाद : िनशा वर्तक


प्रेम व्यक्त करण्यासाठी एखाद्या ठरावीक दिवसाची गरज असते का? की प्रेम हे रोजच्या जगण्यातून उमटले पाहिजे? आणि जर प्रेम रोजचेच असेल, तर व्हॅलेंटाईन डेचा एवढा गाजावाजा कशासाठी? व्हॅलेंटाईन डे आज जगभर साजरा होतो. प्राचीन रोममधील सेंट व्हॅलेंटाईन यांच्या स्मृतीतून सुरू झालेला हा दिवस, जागतिकीकरणाच्या वाऱ्यावर भारतात येऊन स्थिरावला. शहरांमध्ये तर तो आता कॅलेंडरमधील महत्त्वाचा दिवस ठरला आहे. फुले, भेटवस्तू, सोशल मीडिया पोस्ट-सगळे काही प्रेमाच्या नावाखाली. पण हा उत्सव नेमका प्रेमाचा आहे की बाजारपेठेचा, हा प्रश्न विचारायलाच हवा.


शहरी जीवनाकडे पाहिले, तर नाती वेळेअभावी कोरडी होत चालली आहेत. धावपळ, स्पर्धा, करिअर आणि एकटेपणा-या गर्दीत प्रेम व्यक्त करण्यासाठी एखादा दिवस निमित्त ठरतो, हे नाकारता येत नाही. पण प्रश्न असा आहे की, वर्षातील उरलेले दिवस प्रेम कुठे असते? एक दिवस संदेश पाठवून, फोटो टाकून प्रेम सिद्ध होते का? की प्रेम हे रोजच्या संवादातून, सहवासातून आणि जबाबदारीतून दिसायला हवे? आता ग्रामीण जीवनाकडे पाहू. गावाकडे व्हॅलेंटाईन डे साजरा होत नाही, पण प्रेम कमी आहे का? शेतात राबणाऱ्या दांपत्याचे मौन समजून घेणे, आजारी आईसाठी रात्र जागून काढणे, लेकरांच्या भविष्यासाठी स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवणे - हे प्रेम नाही का? फुलांशिवाय, शब्दांशिवाय जगलेले हे प्रेम कुठे कमी ठरते? मग प्रश्न उभा राहतो - प्रेम मोजायचे तरी कशावर? दिखाव्यावर की त्यागावर?


“हा आपला सण नाही” असे म्हणणारे चुकतात का?
की “जे चांगले आहे ते स्वीकारावे” असे म्हणणारे अधिक प्रगल्भ आहेत?
संत तुकारामांनी प्रेमाला आचरणाशी जोडले.
“जैसे बोलणे मधुर, तैसेच असावे आचार”


आज आपण बोलण्यात प्रेमळ आहोत, पण आचारात काय आहे? फक्त एका दिवसापुरती संवेदनशीलता दाखवून आपण वर्षभराच्या उदासीनतेवर पांघरूण टाकतो आहोत का? आणखी एक अस्वस्थ करणारा प्रश्न - व्हॅलेंटाईन डे म्हणजे फक्त स्त्री-पुरुषांच्या प्रेमाचा उत्सव का? आई-वडिलांचे प्रेम, मित्रांचे नाते, वृद्धांचे एकाकीपण, मुलांची भावनिक गरज - या प्रेमाला दिवस नाही का? संतपरंपरेने कधीच प्रेमाला मर्यादा घातल्या नाहीत.


खरा प्रश्न असा उभा राहतो -
आपण प्रेम मोजायचे तरी कशावर?
पोस्टवर, फोटोवर आणि भेटवस्तूंवर?
की त्यागावर, समजुतीवर आणि जबाबदारीवर?
“हा आपला सण नाही” असे म्हणणारे लोक फक्त परंपरेचा आग्रह धरतात का?
की ते आपल्याला काहीतरी महत्त्वाचे सांगू पाहत आहेत?
कारण आपली संस्कृती प्रेमाला वेगळ्या चौकटीत पाहते. संतपरंपरेत प्रेम हे केवळ स्त्री-पुरुषांच्या नात्यापुरते मर्यादित नाही. ते करुणा आहे, माणुसकी आहे, समाजाशी बांधिलकी आहे.
“जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले”
आज या व्याख्येत किती जण सामावले जातात?


गाव-शहर यांच्यातला फरक इथे ठळक होतो. शहरात प्रेम बोलले जाते, दाखवले जाते; गावात ते जगले जाते. शहरात प्रेमाचा उत्सव आहे; गावात प्रेमाची दिनचर्या आहे. मग योग्य कोण? कदाचित दोन्ही बाजूंनी थोडे थांबून विचार करण्याची गरज आहे. शहराने गावाकडून प्रेमाचा साधेपणा शिकावा. गावाने शहराकडून भावना व्यक्त करण्याची मोकळीक. हा समन्वय साधता आला, तर व्हॅलेंटाईन डे वादाचा विषय न राहता आत्मपरीक्षणाची संधी ठरू शकतो.


अखेर प्रश्न एकच उरतो - आपण प्रेम साजरे करतो आहोत की फक्त दिनदर्शिकेतील एक तारीख? प्रेम जर संतवाणीच्या प्रकाशात, संस्कृतीच्या कसोटीवर उतरले, तर त्याला दिवसांची गरज उरत नाही. आणि जर प्रेम फक्त एका दिवसापुरते उरले, तर कितीही सण साजरे केले तरी ते अपुरेच राहील.

Comments
Add Comment

दाट धुक्यामुळे काही दिसेनासे झाले तेव्हा...

- अनिल तोरणे, स्मृतीपटल आपल्या ‘काला बाजार’ या चित्रपटाच्या बाह्यचित्रीकरणासाठी देव आनंद निघाले पण दाट

बाई इतिहास नव्हेत; भविष्याची दिशा...

- प्रा. मधुकर कुलकर्णी; श्रद्धांजली विजया मेहता यांच्या प्रयोगशीलतेचा अर्थ केवळ रंगमंचावरील नव्या

आला आला वारा, संगे पावसाच्या धारा...

हा खेळ सावल्यांचा’ हा चित्रपट १९७६ साली म्हणजे बरोबर ५० वर्षांपूर्वी आला होता! दिग्दर्शक होते वसंतराव तथा

नर्मदावतरण

भालचंद्र ठोंबरे, महाभारतातील मोतीकण  भारतात गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी या नद्यांना जेवढे महत्त्व आहे तेवढेच

जीव घेण्याइतका राग येतो कुठून?

डाॅ. स्वाती गानू,आनंदी पालकत्व एखाद्या तरुणाच्या मनात असा कोणता विचार जन्म घेतो, की तो शांतपणे दुसऱ्या माणसाचा

एक स्वच्छ सुंदर नात विणूया...

अश्विनी शिंदे - भोईर,स्पंदन दुपारचं उन्हाळ्यातलं कडक ऊन. खरं तर जून महिन्यातला हा दिवस. पण पावसाळा लांबल्यामुळे