Wednesday, March 11, 2026

Narendra Modi : "मलेशियाने केलेलं असं स्वागत भारत लक्षात ठेवेल"; कुआलालंपूरमध्ये मोदींनी जिंकली मने

Narendra Modi :

कुआलालंपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या २०२६ मधील पहिल्या परदेश दौऱ्याची सुरुवात मलेशियातून केली आहे. कुआलालंपूर येथे भारतीय समुदायाशी संवाद साधताना त्यांनी दोन्ही देशांमधील घट्ट सांस्कृतिक संबंधांवर भाष्य केले. पंतप्रधान म्हणाले की, "गेल्या वर्षी आसियान (ASEAN) परिषदेला मी उपस्थित राहू शकलो नव्हतो, परंतु माझ्या मित्राला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी मी आज मलेशियात आलो आहे." मलेशियातील भारतीयांच्या उत्साहाचे कौतुक करताना मोदींनी एक महत्त्वाची माहिती दिली की, येथील सुमारे ५०० शाळांमध्ये भारतीय भाषांचे धडे दिले जात आहेत. तसेच, भारतीय संगीत आणि चित्रपटांची लोकप्रियता दोन्ही देशांना अधिक जवळ आणत असल्याचे त्यांनी नमूद केले. मलेशियाने दिलेला सन्मान आणि प्रेम भारत कधीही विसरणार नाही, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशिया दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमधील आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला आहे. "भारत आणि मलेशिया हे केवळ मित्र नसून प्रगतीचे भागीदार आहेत. भारताने गाठलेलं प्रत्येक यशाचं शिखर हे मलेशियासाठीही तितकंच अभिमानास्पद आहे," अशा शब्दांत पंतप्रधानांनी दोन्ही देशांच्या मैत्रीचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी त्यांनी एक अत्यंत महत्त्वाची तांत्रिक घोषणा केली. भारताची लोकप्रिय डिजिटल पेमेंट प्रणाली 'UPI' (युपीआय) लवकरच मलेशियामध्येही लाँच केली जाणार आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक व्यवहार अधिक सोपे होतील. यासोबतच, मलेशियातील स्वामी विवेकानंदांच्या अनुयायांचा आणि आपल्या 'मन की बात' कार्यक्रमातील मलेशियाच्या संदर्भाचा उल्लेख करत त्यांनी सामायिक सांस्कृतिक वारशाचा पुनरुच्चार केला.

Comments
Add Comment