महर्षी याज्ञवल्क्य 

भारतीय ऋषी


वैशंपायनांच्या आश्रमातून सांजसमयी बाहेर पडलेले याज्ञवल्क्य पूर्ण रात्रभर चालतच होते. अरुणोदयाच्या समयी ते एका नदीच्या पात्राजवळ आले. त्या जीवनवाहनीचे निर्मळ जल पाहून याज्ञवल्क्यांच्या मनाला जरा तजेला आला. त्या जलात स्नान करून त्यांनी उगवत्या सूर्यनारायणाला अर्घ्य दिले. सूर्याला नमन करणारे त्यांचे हात तसेच जोडलेले राहिले. ज्ञानोपासनेसाठी याज्ञवल्क्यांनी कठोर सूर्योपासनेस सुरवात केली....


दिवसांमागून दिवस गेले, महिनेच काय, कित्येक संवत्सरे गेलीत. याज्ञवल्क्य महर्षींची सूर्यासमोरची तपश्चर्या चालूच होती. अखेर त्यांची प्रखर ज्ञानपिपासा पाहून सूर्यदेव प्रसन्न झाले. त्यांनी महर्षी याज्ञवल्क्यांच्या हृदयात नवज्ञानाची प्रेरणा व अपूर्व प्रतिभा निर्माण केली. याज्ञवल्क्यांनी सूर्यदेवापासून मिळालेले नवज्ञान सुंदर शब्दात उतरविण्यासाठी सरस्वतीचीही उपासना केली. सरस्वतीने प्रसन्न होऊन महर्षी याज्ञवल्क्यांना सुकविन्द्रोभव असा आशीर्वाद दिला. आणि मग श्रावण शुद्ध पौर्णिमेला सूर्यकिरणांच्या दिव्य स्पर्शाने आणि शारदेच्या आशीर्वादाने महर्षी याज्ञवल्क्यांनी संपूर्ण नवीन यजुर्वेद अक्षरबद्ध केला. तोच शुक्ल यजुर्वेद होय. याज्ञवल्क्यांचा शुक्ल यजुर्वेद म्हणून वैशंपायनांच्या यजुर्वेदास कृष्ण यजुर्वेद म्हणतात. महर्षी याज्ञवल्क्यांनी या आपल्या शुक्ल यजुर्वेदात मंत्रभाग व ब्राह्मणभाग यांची सुस्पष्ट विभागणी केली. वेदाच्या ब्राह्मणभागात मंत्रांवरचे विवेचन असते. शुक्ल यजुर्वेदाच्या ब्राह्मणभागास शतपथ ब्राह्मणग्रंथ म्हणतात. आपले तत्त्वज्ञान सर्वसाधारण लोकांपर्यंत पोचावे म्हणून शतपथ ब्राह्मणग्रंथात महर्षी याज्ञवल्क्यांनी गोष्टीरूपाने विवेचन केले आहे. तसेच मन शिवमय होण्यासाठी शिवसंकल्पसूक्त त्यात समाविष्ट केले आहे. हे कल्याणमय ज्ञान ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र या सर्व वर्णातील लोकांना, एवढेच काय पण आपल्या व परक्या लोकांनाही मिळावे, असे यात म्हटले आहे,


यथेमां कल्याणीमावदानि जनेभ्यः । ब्रह्मराजन्याभ्यां शूद्राय चार्याच च स्वाय चारणाय च ।।


आपली ज्ञानसंपदा सर्वांसाठी खुली असावी, या निर्मळ भावनेने महर्षी याज्ञवल्क्यांनी मिथिलानगरीजवळ भव्य गुरुकुल उभे केले. त्यात हजारो निवासी शिष्य अध्ययन करू लागले. जनकराजाचा त्या आश्रमाला राजाश्रय मिळाला. शुक्ल यजुर्वेदाची ईशावास्य व बृहदारण्यक अशी दोन उपनिषदे आहेत. त्याग आणि उपभोग यांची सुंदर सांगड ईशावास्योपनिषदात आहे,


ईशावास्यमिदं सर्वं यत् किंच जगत्यां जगत् । तेन त्यक्तेन भुंजीथाः मा गृधः कस्यस्विद् धनम् ।।


जे जे जगात आहे, ते सर्व ईश्वराने व्याप्त आहे, तेव्हा आपण मिळविलेल्या सर्व वस्तू आधी ईश्वरार्पण कराव्यात, म्हणजे आपल्या धनात जनताजनार्दनाचाही वाटा गृहित धरून सर्वांसह त्याचा उपभोग घ्यावा. कुणाच्याही धनाचा लोभ ठेवू नये. या इहलोकी आपली कर्तव्यकर्मे करता करताच शंभर वर्षे जगण्याची इच्छा राखावी. निष्काम कर्मांनी कर्मबंध सुटत जाते, असे सांगणाऱ्या ईशावास्योपनिषदात कर्मयोगाची महती महर्षी याज्ञवल्क्यांनी सर्वप्रथम अधोरेखित केली आहे. सूर्यकिरणांमधून महर्षी याज्ञवल्क्यांना जसा ज्ञानस्पर्श झाला, तसाच तो आता चराचरातून होऊ लागला. सर्वात एकच आत्मतत्त्व आहे, ही साक्षात जाणीव होऊन शुक्ल यजुर्वेदाच्या बृहदारण्यक या उपनिषदात अहं ब्रह्मास्मि हे महावाक्य अवतरले. शरीर नाशिवंत असले तरी ’मी“ नाशिवंत नाही. बृहदारण्यक उपनिषदात पुढील शांतिमंत्र सुविख्यात आहे,


पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते । पूर्णस्य पूर्ण मादाय पूर्णमेवावशिष्यते ।।


कारस्वरूप परब्रह्म परिपूर्ण आहे. त्याच्या अधिष्ठानावर भासणारे जगतही परिपूर्ण आहे. पूर्णातून पूर्ण काढून घेतले म्हणजे पूर्णब्रह्मावर भासणाऱ्या पूर्ण जगताचा निरास झाला तरी पूर्णच शिल्लक राहते. दृश्य जगताच्या चराचरात पूर्णब्रह्म विलसत राहते. तमसो मा ज्योतिर्गमय - आम्हाला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानप्रकाशात जायचे आहे, हा सुप्रसिद्ध मंत्र बृहदारण्यक उपनिषदातलाच.


वेदमंत्रांचे उच्चारण शास्त्रशुद्ध व्हावे, यासाठी महर्षी याज्ञवल्क्यांनी शुक्ल यजुर्वेदाचा याज्ञवल्क्यशिक्षा हा ग्रंथ लिहिला. दैनंदिन जीवनातील नीतिनियमांसाठी याज्ञवल्क्यस्मृति हा ग्रंथ लिहून महर्षी याज्ञवल्क्यांनी सुदृढ समाजरचनेचे महान कार्य केले आहे. परित्यक्ता स्त्रीच्या पालनपोषणाची जबाबदारी पतीवरच असावी, वृक्षतोड हा दंडनीय गुन्हा असावा, अशासारखी प्रागतिक मते त्यांनी यात मांडली आहेत. धर्मासह सृष्टीनियम, समाजरक्षण इ. अनेक विषयांवर साधकबाधक विवेचन केले आहे. याज्ञवल्क्यस्मृतीतील सूत्रांचा आधार आजही भारताच्या राज्यघटनेत, कायद्यात घेतलेला दिसून येतो.


महर्षी याज्ञवल्क्यांचा कात्यायनीशी विवाह झाला. कात्यायनी आदर्श गृहिणी तर होतीच पण तिने याज्ञवल्क्यांच्या गुरुकुलाचे व्यवस्थापनही समर्थपणे सांभाळले. जनकराजाच्या राजसभेत जी तत्त्वचर्चा झाली होती, त्या सभेला विदुषी गार्गीबरोबर तिची विद्वान भाची मैत्रेयी ही पण तेथे उपस्थित होती. आपल्या अमोघ ज्ञानशक्तीने सर्व विद्वत्सभा जिंकून घेणाऱ्या याज्ञवल्क्यांच्या दर्शनाने ती मोहरून गेली होती. त्यानंतर तिच्या ध्यानीमनी केवळ याज्ञवल्क्यच भरून गेले. तिची प्रेमविव्हल अवस्था गार्गीने ओळखली व तिला याज्ञवल्क्यांची अर्धांगिनी कात्यायनी हिच्याकडेच पाठवले. कात्यायनी व मैत्रेयी या दोघींची गाढ मैत्री झाली. मैत्रेयीच्या मनातील याज्ञवल्क्यांविषयीचा समर्पित भाव कात्यायनीने जाणला आणि याज्ञवल्क्य-मैत्रेयीचे नाते जुळविण्यात कात्यायनीनेच पुढाकार घेतला. द्वितीय भार्या म्हणून मैत्रेयीचा याज्ञवल्क्यांच्या जीवनात प्रवेश झाला, पण त्यामुळे कात्यायनीचे याज्ञवल्क्यांच्या संसारातील स्थान अधिकच दृढ झाले.


महर्षी याज्ञवल्क्यांच्या आयुष्यात एक वादळ आले. त्यांची लहान बहीण गर्भवती असतानाच तिला वैधव्य आले. त्यामुळे सैरभैर होऊन ती कोणाच्या नकळत घराबाहेर पडली, वाट फुटेल तेथे जाऊ लागली. एका पिंपळाच्या झाडाखाली बाळाला जन्म देऊन ती देवाघरी गेली. पिंपळवृक्षातळी जन्मला म्हणून त्या बाळाला पिप्पलाद नाव मिळाले. कुमारवयातच त्याला वाचासिद्धी प्राप्त झाली होती. आपले मामा याज्ञवल्क्य एवढे मोठे आचार्य असूनही आपल्या आईची अशी अवस्था त्यांनी का होऊ दिली, म्हणून त्यांच्याबद्दल त्याच्या मनात राग होता. म्हणून त्याने एक भयंकर कृत्या याज्ञवल्क्यांवर सोडली. त्या कृत्येपासून बचाव करण्यासाठी याज्ञवल्क्य भगवान शिवापाशी गेले व आपल्या योगसामर्थ्याने शिवांच्या उजव्या पायाच्या अंगठ्यात ते शिरून बसले. त्यांच्यावर शिव प्रसन्न झाले. ती कृत्याही निष्प्रभ झाली. शिवांनी याज्ञवल्क्यांना योगीश्वर पदवी दिली. पिप्पलादालाही आपल्या मामांचे माहात्म्य मान्य झाले.


महर्षी याज्ञवल्क्यांना आता लौकिक जीवनाचा त्याग करून संन्यासाश्रम स्वीकारायचा होता. आपल्या दोन्ही भार्यांमध्ये मिळकतीची वाटणी व्हावी, अशी इच्छा त्यांनी प्रकट केली. पण मैत्रेयीने याज्ञवल्क्यांकडून लौकिक धनाऐवजी आध्यात्मिक धनाची मागणी केली. याज्ञवल्क्यांनी प्रसन्नतेने तिला आत्मज्ञान दिले. त्या दोघांचा संवाद बृहदारण्यकात आहे. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति सर्व जगात भरलेल्या आत्मभावाने प्रेमभाव निर्माण होतो, असे ते तिला म्हणतात. याज्ञवल्क्य सर्वसंगपरित्याग करून वनात जाण्याआधी त्यांचा अमृतोत्सव करावा, असे त्यांच्या शिष्यांनी, जनकराजाने ठरविले. या समारंभास देवी सरस्वती, पार्वतीसह शिवही उपस्थित होते. महर्षी याज्ञवल्क्य शिवासमोर नतमस्तक झाले तेव्हा शिवांनी त्यांना वरदान मागायला सांगितले. महर्षी याज्ञवल्क्य म्हणाले,


काले वर्षतु पर्जन्यः पृथिवी सस्यशीलीनी देशोSक्षोभरहितो सज्जनाः सन्तु निर्भयाः ।।
सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्व भ्रद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःखमाप्नुयात् ।।


वेळेवर पाऊस पडावा, वसुंधरा धनधान्याने परिपूर्ण रहावी, देशात कधी अराजक माजू नये, सज्जनांना निर्भयतेने वावरता यावे. सर्वच लोक सुखी निरामय असावेत. खऱ्या मांगल्याची सगळ्यांना जाणीव असावी, आत्मसुखापासून कोणीही वंचित राहू नये. असे सर्वमंगलतेचे वरदान महर्षी याज्ञवल्क्यांनी शिवाजवळ मागितले. नंतर ते सर्वसंगपरित्याग करून परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी वनात निघून गेले.
- डॉ. अनुराधा कुलकर्णी

Comments
Add Comment

सत्संग : अंतर्मुखतेकडून आत्मोन्नतीकडे

प्राची परचुरे वैद्य मानवी जीवन हे केवळ भौतिक गरजांच्या पूर्ततेपुरते मर्यादित नसून ते विचार, मूल्ये, भावना आणि

तृतीयपंथियांचा आक्रोश

ऋतुराज ऋतुजा राजेश केळकर अचानक एक बाळाचा आक्रोश हवेत पसरला आणि सगळे थरारले. तिसऱ्या मजल्यावरील बंद घरातून तो

आत्मबोधाचा शाश्वत आनंद

अर्चना सरोदे मातेच्या गर्भात असताना जीवाला स्वस्वरूपाची जाणीव असते . पण गर्भामध्ये “ सोहं सोहं ” करणारा हा जीव

संत निळोबाराय

नाही त्या उरले दुजे ने कृष्णवीण। बाह्य अंतःकरण कृष्ण झाला ॥ जीवाचाही जीव शिवाचाही शिव । देही देहभान कृष्ण झाला

संत तुकाराम

लवण मेळविता जळे लवण मेळविता जळे। कार्य उरले निराळे॥ तैसा समरस झालो। तुजमाजी हरपलो अग्नी कर्पूराच्या मेळी। काय

संत चोखामेळा

ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा। काय भुललासी वरलिया रंगा ॥ कमान डोंगी