Monday, February 16, 2026

संत तुकाराम

संत तुकाराम

लवण मेळविता जळे लवण मेळविता जळे। कार्य उरले निराळे॥ तैसा समरस झालो। तुजमाजी हरपलो अग्नी कर्पूराच्या मेळी। काय उरली काजळी॥ तुका म्हणे होती। तुझी माझी एक ज्योती॥

-  डॉ. देवीदास पोटे

भक्ताचे भक्तीचे परिमाण अतिशय उत्कट अवस्थेला गेले की,, भक्त आणि देव यात वेगळेपण राहत नाही. भक्त देवरूपात विलीन होऊन जातो. त्यांच्यातले द्वैत संपून जाते. ईश्वरभक्तीचा उत्कट भक्तिरंग संत तुकारामांनी या अभंगात व्यक्त केला आहे. ते म्हणतात, "पाण्यामध्ये मीठ मिसळले तर ते पूर्णपणे विरघळून जाते. मिठाचे वेगळे असे अस्तित्व राहत नाही. पाण्यामध्ये मीठ मिसळले आहे याची किंचितही जाणीव पाणी आपल्या मनात ठेवीत नाही. हे विठ्ठला, मी तुझ्या भक्तिरंगात पाण्यातल्या मिठाप्रमाणे पूर्णपणे विलीन झाले आहे, તનામનાભાतनामनाच्या पेशीपेशींनी मी तुझ्यात विरघळून गेलो आहे. तुला पाहिले की, मी म्हणजे तूच होऊन जातो. अग्नीत ज्याप्रमाणे कापूर टाकला की तो कापूर उजळून निघतो आणि त्या अग्नीमध्ये पूर्णपणे एकरूप होऊन जातो. त्याची जराशी सुद्धा काजळी मागे उरत नाही. हे विठुराया, तुझ्या माझ्या अस्तित्वाच्या दोन ज्योती एकरूप होऊन गेल्या आहेत.

दोन वाती एकत्र केल्यावर त्याची एकत्र ज्योत होते आणि प्रज्वलित होऊन प्रकाशाचे तरंग पसरवीत राहते. त्याचप्रमाणे तुझ्या माझ्यातली मी-तू ही वेगळेपणाची जाणीव नाहीशी होऊन आपले एकरूपत्व झाले आहे. आपल्यातला द्वैतभाव पूर्णपणे विसर्जित पावला आहे. आपल्या दुसऱ्या एका अभंगात हाच आशय व्यक्त करताना यांनी म्हटलंय,

अग्नीमाजी गेले । अग्नी होउन तेच ठेले ।। लोह लागे परिसा अंगी। तो ही भूषण जाला जगी ।।

एखादा पदार्थ अग्नीत टाकला की तो आग्निरुपच होऊन जातो. लोखंडाला परिसाचा स्पर्श होताच ते जगाला सुवर्णाच्या रूपाने भूषण होते.

रोजच्या दैनंदिन व्यवहारातली उदाहरणे देत, मूळ विषय सोपा करीत उलगडून सांगणे हे संत तुकारामांच्या काव्यशैलीचे वैशिष्ट्य आहे. सर्वसामान्य लोकांना सहज समजेल अशा लोकभाषेत त्यांनी अभंगरचना केली. म्हणूनच त्यांचा अभंगगाथेला 'पाचवा वेद' असे म्हणतात.सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातील सुखदु:खाचे प्रतिबिंब संत तुकारामांच्या अभगवाणीत उमटलेले आहे. म्हणून संत तुकाराम हे लोकांना जवळचे वाटतात. आंतरिक साक्षात्काराची अलौकिक अनुभूती संत तुकारामांनी नेमकेपणाने मांडली आहे.

Comments
Add Comment