“महायुतीच्या एकजुटीपुढे कुणाचीही डाळ शिजणार नाही, सिंधुदुर्गात महायुतीच्या १०० टक्के विजयाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्धार

कुडाळच्या विराट सभेत तळ कोकणावर महायुतीचा भगवा फडकवण्याचे आवाहन


कुडाळ : कोकणात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांची ताकद एकत्र असून, जिल्हा परिषद निवडणुकीत ज्या जिल्ह्यात शंभर टक्के विजयाची खात्री देता येईल, तो जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचा कारभार निष्कलंक राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ येथे पार पडलेल्या विराट जाहीर सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या महाविजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला.


सभेत शिंदे यांनी मतदारांना आवाहन करत महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करून जिल्हा परिषदेवर महायुतीचा भगवा फडकवण्याचे आवाहन केले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, माजी मंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, रवींद्र फाटक, प्रमोद जठार, दत्ता दळवी, संजय आंग्रे, दीप्ती पडते, श्वेता कोरगावकर यांच्यासह महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शिंदे म्हणाले की, मुंबई आणि ठाण्यात महायुतीला मिळालेला विजय हा कोकणातील मतदारांच्या निर्णायक भूमिकेमुळे शक्य झाला आहे. कोकणी माणसाने या निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असून, त्याचाच परिणाम म्हणून मुंबई, ठाणे आणि राज्यातील अनेक महापालिका व नगरपालिकांमध्ये महायुतीला यश मिळाले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्याचे सांगत, कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरच आमदार, खासदार, मंत्री आणि मुख्यमंत्री घडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


महायुतीची एकजूट हीच आमची खरी ताकद असल्याचे सांगताना शिंदे यांनी नितेश आणि निलेश राणे एकत्र असल्यामुळे सिंधुदुर्गात विरोधकांची डाळ शिजणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. आधीच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनेक जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध किंवा मोठ्या फरकाने निवडून आले असल्याचे सांगत, यावेळीही इतिहास घडेल, असे त्यांनी नमूद केले.


नारायण राणे यांच्या नेतृत्वाबाबत बोलताना शिंदे यांनी त्यांच्या प्रशासकीय क्षमतेचा उल्लेख केला. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते म्हणून राणे यांनी घेतलेल्या अभ्यासपूर्ण आणि धाडसी निर्णयांची आठवण करून देत, धोकादायक इमारतींबाबत त्यांनी घेतलेल्या तत्काळ निर्णयांमुळे लाखो लोकांचे घरे वाचल्याचा अनुभव त्यांनी सभेत सांगितला. राणे साहेबांचा दरारा, अभ्यास आणि प्रशासनावरची पकड कोकणाच्या विकासासाठी नेहमीच उपयोगी ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


शिंदे यांनी सांगितले की, राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आज एक आदर्श परिषद म्हणून ओळखली जाते. पुढील काळातही शंभर टक्के विजय मिळवून ही परिषद महाराष्ट्रात आदर्श ठरेल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कोकणातील विकास प्रस्तावांना कॅबिनेटमध्ये तात्काळ मंजुरी मिळते, असेही त्यांनी नमूद केले.


विकासासाठी मोठ्या बजेटची आवश्यकता असल्याचे सांगत, कणकवलीसारख्या भागांसाठी किमान १०० कोटी रुपयांचे बजेट असावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. रस्ते, पाणीपुरवठा, सिंचन, पर्यटन, उद्योग, रोजगार आणि मूलभूत सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असा शब्द त्यांनी दिला.


शिंदे यांनी आपल्या कार्यकाळातील लोकहिताच्या निर्णयांची सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुलींच्या उच्च शिक्षणासाठी 100 टक्के फी सवलत, शेतकरी सन्मान योजना, पीक विमा योजना, १३२ सिंचन प्रकल्पांना गती, महिलांसाठी आरोग्य व सुरक्षितता योजना, तसेच ५ लाख रुपयांचा विमा संरक्षण या सर्व योजना सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या असल्याचे त्यांनी सांगितले.


शिंदे यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचाही विशेष उल्लेख केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने यंदाच्या बजेटमध्ये कोकणाचा विचार करत पर्यटन, बंदरविकास, काजू, आंबा, नारळ यासारख्या स्थानिक उत्पादनांशी संबंधित योजना आणि पायाभूत सुविधांसाठी तरतूद केली आहे. सिंधुदुर्ग हा निसर्गाने नटलेला, छोटा पण प्रचंड विकासक्षम जिल्हा असून, केंद्र आणि राज्य सरकार मिळून या भागाचा सर्वांगीण विकास घडवून आणतील,” असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.


“तरुणांच्या हाताला काम, उद्योगांना चालना आणि पर्यटनातून रोजगारनिर्मिती हे आमचे प्राधान्य असून, सिंधुदुर्गाला काहीही कमी पडू देणार नाही,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले. शेवटी शिंदे यांनी मतदारांना आवाहन करत सांगितले की, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांचे अधिकृत उमेदवारच निवडून आणावेत. बंडखोर किंवा इतर कोणालाही मत देऊ नका, असे स्पष्ट करत धनुष्य-बाण, कमळ आणि घड्याळ या चिन्हांवर लक्ष ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले.


“ही निवडणूक केवळ मतदानापुरती नाही, तर सिंधुदुर्गाच्या आणि आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा फैसला करणारी आहे. महायुतीला मत म्हणजे विकासाला मत,” असे सांगत त्यांनी सभेचा समारोप केला. उपस्थितांचे आभार मानत त्यांनी “जय महाराष्ट्र”च्या घोषणांसह सभेची सांगता केली आणि महायुतीत नव्याने प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत केले.


Comments
Add Comment

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; देशस्थिती, महाराष्ट्रातील प्रश्नांवर सखोल चर्चा

नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी

थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा; सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या कर्जाला मिळणार माफी!

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे विधान परिषदेत आश्वासन मुंबई : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात

छत्रपती शिवरायांच्या अपमानावर संजय राऊत गप्प का ?

मुंबई : धर्मांध आक्रमकांचा उदोउदो करण्याची सवय जडलेल्या आणि मुस्लीमांचे तुष्टीकरण करणा-या संजय राऊतांनी

भाजप आमदार मंदा म्हात्रे रुग्णालयात

बेलापूर : बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे हृदयविकाराचा झटका आल्यामुळे नवी मुंबई येथील

ग्रामीण भागातील घरबांधणी आता होणार सुलभ; बांधकाम परवानगीचे अधिकार तालुका स्तरावर देण्याचे संकेत!

- मंत्री उदय सामंत यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या घराच्या