Eknath Shinde: कोकणात प्रदूषणकारी कंपन्यांना थारा नाही; जनतेच्या आरोग्याशी खेळ होऊ देणार नाही!

लोटे परशुराम एमआयडीसीतील ‘मितेनी’–‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ कंपनीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका

चिपळूण, ता. ३ : कोकणच्या मातीवर, पाण्यावर आणि जनतेच्या श्वासावर घाला घालणाऱ्या प्रदूषणकारी उद्योगांविरोधात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट रणशिंग फुंकलं! चिपळूण तालुक्यातील खेड येथील लोटे परशुराम एमआयडीसीत इटलीतून हद्दपार करण्यात आलेली मितेनी कंपनी अप्रत्यक्षपणे ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ या नावाने कार्यरत आहे. “अशा प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना कोकणात थारा देणार नाही! जनतेच्या आरोग्याशी खेळ होऊ देणार नाही!”असे सांगत त्यांनी अत्यंत आक्रमकपणे आणि स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली. विकासाच्या नावाखाली कोकणचा निसर्ग आणि लोकांचे आयुष्य धोक्यात घालणाऱ्या शक्तींविरोधात सरकार कठोरात कठोर भूमिका घेईल, असा निर्धार त्यांनी यावेळी जनतेसमोर मांडला.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिपळूणच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजकीय सभेऐवजी जणू विकासाचा रणसंग्रामच उघडला. हजारोंच्या जनसमुदायासमोर त्यांनी कार्यकर्त्यांची ताकद, कोकणाशी शिवसेनेचं ऐतिहासिक नातं, महिलांपासून शेतकऱ्यांपर्यंतच्या योजना, केंद्र-राज्य सरकारची “डबल इंजिन” शक्ती आणि रत्नागिरी जिल्ह्यावर भगवा फडकवण्याचा निर्धार एका श्वासात मांडला.

सभेच्या सुरुवातीलाच शिंदेंनी उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अकाली निधनावर श्रद्धांजली अर्पण करत वातावरण भावनिक केलं. मात्र त्यानंतर त्यांनी स्पष्ट केलं की ही केवळ उमेदवारांची नाही, तर कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि ही निवडणूक विकासाच्या भवितव्याचा फैसला करणारी आहे.

शिंदेंनी ठामपणे सांगितलं की पक्षाचा खरा कणा हा कार्यकर्ता आहे. या पक्षात कोणी मालक नाही, कुणी नोकर नाही, आपण सगळे कार्यकर्ते आहोत आणि संपूर्ण पक्षाचा डोलारा हा कार्यकर्त्यांच्या जीवावर उभा आहे, असा थेट संदेश त्यांनी शिवसेना, भाजप आणि आरपीआयच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.

कोकणाच्या ऐतिहासिक आणि पवित्र भूमीचा उल्लेख करत त्यांनी शिवसेना आणि कोकणाचं भावनिक नातं उलगडलं. शिवसेनेचा जन्म मुंबईत झाला असला तरी तिची नाळ कोकणात पुरलेली आहे, बाळासाहेबांनी कोकणावर भरभरून प्रेम केलं आणि कोकणानेही शिवसेनेवर तेवढंच प्रेम केलं, असं सांगत त्यांनी नारळी-पोफळी, आंबा, काजू, मत्स्य व्यवसाय आणि निसर्गसंपन्न कोकणाच्या विकासाची गरज अधोरेखित केली.

विधानसभेतील महायुतीच्या २३२ आमदारांच्या ऐतिहासिक विजयाचा उल्लेख करत शिंदेंनी, हा विजय माझ्या लाडक्या बहिणींच्या भावाने घडवलेला चमत्कार असल्याचं सांगितलं आणि महिलांच्या मतदानशक्तीचं खुलेपणाने कौतुक केलं.

लाडकी बहिण योजनेबाबत बोलताना त्यांनी ठाम शब्दांत सांगितलं की ही योजना कधीही बंद होणार नाही. दरवर्षी ४५ हजार कोटी रुपयांचा खर्च करून अडीच ते पावणेतीन कोटी महिलांना थेट लाभ दिला जात आहे. या योजनेमुळे महिलांना स्वतःच्या नावावर पैसे काढण्याचा अधिकार मिळाला, समाजात सन्मान वाढला आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग खुला झाला, असं त्यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांसाठी सरकारने राबवलेल्या योजनांचा आढावा घेताना त्यांनी शेतकरी सन्मान योजना, पिक विमा सुलभ योजना, कर्जमाफीसाठी समिती स्थापन आणि अतिवृष्टीसाठी ३२ हजार कोटींच्या पॅकेजचा उल्लेख केला. छोट्या शेतकऱ्यांनाही न्याय दिला जाईल आणि शेतकऱ्यांना सरकार कधीही सोडणार नाही, असा ठाम शब्द त्यांनी दिला.

मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधीतून कोट्यवधी रुपयांची मदत दिल्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की ७० ते ८० हजार रुग्णांना थेट लाभ झाला असून अनेकांचे प्राण वाचले आहेत. माझ्या एका सहीमुळे लोकांचे जीव वाचत असतील तर त्याहून मोठं समाधान काहीच नाही, असं त्यांनी भावनिक शब्दांत सांगितलं.

‘शासन आपल्या दारी’ या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे सरकारी कार्यालयांचे फेरे थांबले असून जवळपास पाच कोटी लोकांपर्यंत सेवा पोहोचल्याचा दावा त्यांनी केला. ही महाराष्ट्राच्या प्रशासनातील मोठी उपलब्धी असल्याचं त्यांनी नमूद केलं.

कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विकासाचा मास्टरप्लॅन मांडला. मुंबई ते अलिबाग ते सिंधुदुर्ग-गोवा असा ग्रीनफिल्ड रस्ता, कोकण विकास प्राधिकरण, काजू, आंबा आणि मत्स्य व्यवसायाला चालना, ३० लाख कोटींचे उद्योग करार, रस्ते आणि रेल्वेला प्राधान्य, तसेच पर्यटन स्थळांचे सुशोभीकरण या सर्व बाबी त्यांनी सविस्तर मांडल्या.

महिलांसाठी बचत गट, प्रशिक्षण केंद्रे आणि ‘लखपती दीदी’ योजनेच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग मोकळा केला जाईल, असं सांगत त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला.

मितेनी - लक्ष्मी ऑरगॅनिक या प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांबाबत बोलताना त्यांनी लोकांचे आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे आणि जे कारखाने लोकांच्या आरोग्याला घातक ठरतील त्यांना सरकार कधीही पाठीशी घालणार नाही असे स्पष्ट केले.

चिपळूण तालुक्यातील भूस्खलनग्रस्त भागांसाठी संरक्षण भिंत उभारण्याचा आणि कळवंडे धरणाच्या दुरुस्तीचा ठाम शब्द देत त्यांनी लोकजीवन धोक्यात येऊ देणार नाही, ही सरकारची जबाबदारी असल्याचं सांगितलं.

ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटीमध्ये सवलत, तीर्थदर्शन योजना, तसेच महिलांसाठी व्यावसायिक केंद्रे आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक आणि आर्थिक बळकटीकरणाचा कार्यक्रम राबवला जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

केंद्र सरकारच्या बजेटचं कौतुक करत शिंदेंनी सांगितलं की भारत आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत आहे आणि हे बजेट त्या दिशेने टाकलेलं दमदार पाऊल आहे. केंद्र आणि राज्य सरकार सर्वसामान्य माणसाचा विचार करून काम करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

राजकारणात शब्दाला किंमत असते, असा ठाम संदेश देत त्यांनी आपली त्रिसूत्री मांडली. उपलब्धता, साधेपणा आणि विश्वासार्हता. शब्द दिला की तो पाळणं हीच माझी ओळख आहे, असं त्यांनी सांगितलं.

शेवटी त्यांनी थेट आवाहन केलं की ७ तारखेला धनुष्यबाण आणि कमळाच्या निशाणावर बटण दाबा, सर्व उमेदवारांना विजयी करा आणि रत्नागिरी जिल्ह्यावर महायुतीचा भगवा डौलाने फडकवा. ही केवळ मतदानाची नाही, तर तुमच्या आणि कोकणाच्या भवितव्याची निवडणूक आहे, असा ठाम एल्गार त्यांनी केला.

सभागृहात आणि सभोवतालच्या रस्त्यांवर उसळलेला जनसागर, महिलांचा, युवकांचा आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता ही सभा केवळ प्रचारसभा नव्हती, तर चिपळूण आणि कोकणाच्या विकासासाठी दिलेली राजकीय घोषणा ठरली.

यावेळी उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसेनेचे सर्व उमेदवार आणि चिपळूणमधील सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Add Comment

MPSC कडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; उमेदवारांना मोठा दिलासा

अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी मिळाली नवी मुदत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या;सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या लॉटरीत प्रतिसाद न मिळणाऱ्या घरांची 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर विक्री करा;पुणे, शिरूर,

Shetkari Karjmafi update : कर्जमाफी योजनेत १ लाख ४० हजार शेतकरी अपात्र; प्राप्तिकर आणि अन्य कारणांनी वगळल्याची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

१६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत निधी जमा होणार मुंबई : राज्य सरकारने घोषित केलेल्या 'पुण्यश्लोक

Tuljabhavani Temple Land Case : तुळजाभवानीच्या १,६६८ हेक्टर जमिनींच्या कथित घोटाळ्यावर समिती आक्रमक; 'तातडीने ताबा घ्या, नाहीतर कोर्टात भेटू!'

पुणे : श्री तुळजाभवानी देवस्थानच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील

Devendra Fadnavis : गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मुख्यमंत्र्यांनी घेतला एमआयडीसीअंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुंबई

Road Accident : घाटात मोठा अपघात, ब्रेक फेल झाला आणि ट्रकने SUV चिरडली; तीन वाहनांचे प्रचंड नुकसान

गडचिरोली : कोरची - कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर बेडगाव घाटात बुधवारी (५ ऑगस्ट २०२६) सकाळी साडेअकराच्या सुमारास