मुंबई : अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्ताकेंद्र, नेतृत्व आणि प्रतिनिधित्व याबाबत महत्त्वाच्या घडामोडींना वेग आला आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर पुत्र पार्थ पवार यांची वर्णी लागू शकते, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. याचबरोबर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीही नव्या नावांवर मंथन सुरू झाले आहे.
सुनेत्रा पवार यांनी शनिवारी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक राज्यसभा जागा रिक्त झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या जागेवर अजित पवारांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ पवार यांना पाठवण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली असून, अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेली बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक त्या लढवणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
पार्थ पवार यांनी यापूर्वी २०१९ मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला होता. आता राज्यसभेच्या माध्यमातून पार्थ पवार राजकीय कारकिर्दीची नव्याने सुरुवात करू शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे. पक्षातील नेतृत्वबदलाचे संकेत म्हणूनही याकडे पाहिले जात आहे.
राष्ट्रीय अध्यक्षाबाबत मतप्रवाह
दरम्यान, अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्वही प्रभावीपणे सांभाळत होते. त्यांच्या अकाली जाण्यामुळे पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वाची धुरा कोणाकडे सोपवायची, यावर चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत पक्षात दोन मतप्रवाह आहेत. सध्या कार्याध्यक्ष असलेले प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करावी, असा सूर पक्षातील एका गटाकडून व्यक्त केला जात आहे. प्रफुल्ल पटेल हे अनुभवी नेते असून राष्ट्रीय पातळीवरील त्यांचा दीर्घ अनुभव पक्षासाठी उपयुक्त ठरेल, असा यामागचा युक्तिवाद आहे. मात्र, दुसरीकडे राष्ट्रीय अध्यक्षपद हे अजित पवारांकडे होते, त्यामुळे हे पद पवार कुटुंबातच राहावे आणि सुनेत्रा पवार यांनी पक्षाची धुराही सांभाळावी, अशी मागणीही काही नेत्यांकडून केली जात आहे.
विलिनीकरण अनेकांना अमान्य
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या विलिनीकरणाची शक्यता वर्तवली जात असतानाच, अजित पवार यांच्या गटातील राष्ट्रवादीचे अस्तित्व स्वतंत्रच ठेवावे, अशी भूमिका अनेक नेत्यांकडून मांडली जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे एकीकरणाऐवजी स्वतंत्र वाटचालीचा पर्याय पुढे येताना दिसत आहे.