मुंबई : “कठीण प्रसंगात संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आहे; मात्र सध्या राज्यात आणि पक्षात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींशी कुटुंबीयांचा काहीही संबंध नाही”, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी दिली. अजित पवार यांच्या रिक्त झालेल्या पदांबाबतची चर्चा मुंबईत सुरू असल्याचे माध्यमांतून वाचायला आणि पाहायला मिळत आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे पक्षातील प्रमुख नेते असून, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. प्राधान्यक्रम काय असावा, हे ठरवण्याचा अधिकार त्यांचा आहे. त्यावर आम्ही भाष्य करणार नाही”, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बारामती येथे माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, जिल्हा परिषदेच्या सुरू असलेल्या निवडणुकांची संपूर्ण जबाबदारी अजित पवार यांच्याकडे होती. आपण स्वतः या निवडणुकांत प्रत्यक्ष सहभागी होत नसल्याचे सांगत शरद पवार म्हणाले की, त्यांनी काय करायचे याचे सविस्तर ‘ब्रिफिंग’ मला दिले होते आणि त्यानुसार ते कामाला लागले होते. याच दरम्यान हा अपघात घडला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाच्या चर्चेत मी थेट सहभागी नव्हतो. अजित पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे यांसह काही सहकारी या प्रक्रियेत सातत्याने सहभागी होते. गेल्या चार महिन्यांपासून या चर्चा सुरू होत्या आणि सर्वांना एकत्र आणण्याच्या प्रक्रियेच्या ते जवळपास अंतिम टप्प्यावर पोहोचले होते. शेवटचे ‘ब्रिफिंग’ त्यांनी आम्हाला दिले होते, असेही शरद पवार यांनी सांगितले.
या चर्चेत प्रामुख्याने अजित पवार आणि जयंत पाटील सहभागी होते आणि दोन्ही पक्षांमध्ये एकत्रीकरणाबाबत एकमत झाले होते. येत्या १२ फेब्रुवारी रोजी निर्णय जाहीर करण्याचे ठरले होते आणि ही तारीख अजित पवार यांनीच निश्चित केली होती. मात्र, या अपघातामुळे त्या प्रक्रियेला खंड पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे एकत्रीकरण व्हावे, ही अजित पवार यांची इच्छा होती आणि ती पूर्ण व्हावी, अशी आमचीही मनापासून इच्छा असल्याचे शरद पवार यांनी नमूद केले. पुढील काळात काय करायचे, याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, आता नव्या पिढीला प्रोत्साहन देणे आणि अजित पवार यांच्या जाण्याने निर्माण झालेली मोठी पोकळी, तसेच झालेला तोटा भरून काढण्यासाठी जे-जे शक्य आहे, ते सर्व करण्यावर आमचा भर राहील.
अजित पवारांचे निधन हा मोठा धक्का
- अजित पवार यांच्या कार्यपद्धतीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, लोकांच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास करून त्यावर न्याय देण्याचा प्रयत्न करणे, हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांचा दिवस सकाळी सहा-सात वाजल्यापासून सुरू होत असे. आज सकाळी नऊच्या सुमारास आपण बोलत असताना ते हयात असते, तर ते कामाच्या ठिकाणी, फिल्डवर सक्रिय दिसले असते. गेली ३० ते ४० वर्षे पक्ष, सहकारी, बारामतीतील नागरिक आणि मित्रांनी त्यांना अखंड साथ दिली. कामात त्यांनी कधीही कमतरता दाखवली नाही.
- अजित पवार यांच्यासारखी कर्तृत्ववान व्यक्ती अचानक आपल्यातून निघून जाणे हा अत्यंत मोठा धक्का असून, तो आम्हा सर्वांवर आहे. या परिस्थितीला सामोरे जाणे अपरिहार्य आहे. लोकांचे दुःख कमी करण्यासाठी संवेदनशीलपणे काम करावे लागेल. त्यांनी रुजवलेली कामाची शिस्त आणि पद्धत पुढे सुरू ठेवावी लागेल. हे काम पवार कुटुंबातील नवी पिढी नक्कीच करेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. आमचीही काही जबाबदारी आहेच; मात्र पुढील काळात नव्या पिढीवर अधिक जबाबदारी असेल, आणि ती पेलण्याची क्षमता त्यांच्यात आहे, असे त्यांनी सांगितले.