संत कबीर

हीरा वहाँ न खोलिये
हीरा वहाँ न खोलिये, जहाँ खोटी है हाट।
कस करि बाँधो गाँठरी,
ऊठ कर चालो बाट।।


- डॉ. देवीदास पोटे


आंधळ्याच्या राज्यात पैठणी विकायला जाऊ नये असे एक वचन आहे. संत कबीर यांनी हेच व्यावहारिक तत्व आपल्या रचनेद्वारा प्रतिपादन केले आहे. या रचनेत संत कबीर म्हणतात, " जिथे प्रामाणिकपणा वा पारख नसेल वा बाजार लबाडीने भरलेला असेल तिथे आपल्याजवळचा हिरा विकायला काढू नये, अशा वेळी तो हिरा आपल्या कनवटीला कनकचून बांधून पुढची वाटचाल करणे हेच श्रेयस्कर असते."


जिथे गुणांची पारख नसेल तिथे आपले शहाणपणाचे बोल व्यर्थ ठरतात. हिरा अस्सल आहे हे ओळखण्यासाठी रत्नपारखी हवा असतो. हे येरागबाळ्याचे काम नाही. गुणांची पारख करणारा जसा ज्ञानी हवा तसाच तो प्रामाणिकही हवा. जिथे लबाडी वा खोटेपणा असेल तिथे अस्सल हिरा वा गुणवान माणसांचा निभाव लागणार नाही. संत कवीर हे स्पष्टवक्ते आणि व्यवहारातले सत्य जाणणारे होते. मनुष्यस्वभावाची त्यांना जाण होती. म्हणूनच असंगाचा संग करू नये हे तत्व त्यांनी अत्यंत समर्पक उदाहरणाद्वारे स्पष्ट केले आहे. गुणांची कदर सज्जनांच्या गावातच होते. संत सज्जनांच्या ठायी सत्य, प्रेम, नीती, करूणा, मानवता यांचे अधिष्ठान असते. हे विश्वचि माझे घर' अशी त्यांची विशाल जीवन दृष्टी असते. जगातील अवघे लोक आपले बंधू, आप्त आहेत अशी त्यांची सर्वात्मक विचारसरणी असते. याउलट लबाडांच्या राज्यात सारेच खोटे, वरवरचे आणि दिखाऊ असते. सद्गुणांना तिथे काहीच किंमत नसते. दुष्टपणा, अनीती, बनवाबनवी, फसवणूक अशा नकारात्मक गोष्टींनी लबाडीचा गाव परिपू्र्ण असतो. यामुळेच सूज्ञ, विवेकी माणसाने आजूबाजूच्या परिस्थितीचे, स्थळकाळाचे भान ठेवावे असे कबीरांनी सुचविले आहे, संत आपल्या आयुष्यात दिशादर्शक दीपस्तंभाचे काम करतात, ते असे. लोकांना आयुष्यातील चांगला गोष्टींबाबत मार्गदर्शन करणे हे संतांचे ब्रीद असते. धर्म रक्षा वयासाठी । करणें आटी आम्हासी ।।' असे संत तुकाराम म्हणतात, ते याच भूमिकेतून. जनलोकांच्या कल्याणासाठी चंदनाप्रमाणे झिजणे हेच संतांच्या आयुष्याचे प्रयोजन असते. संतांचे संतपण ते हेच.

Comments
Add Comment

समर्थ रामदास

डॉ. देवीदास पोटे जगी सर्वसुखी असा कोण आहे ?। विचारी मना तूचि शोधूनि पाहे ॥ 'मनाचे श्लोक' हे समर्थाचे अतिशय

संसारी असावे सावध

जीवन संगीत,सद्गुरू वामनराव पै सर्ग, नियम व आपले कर्म यांचा आपल्या जीवनातील घडामोडींशी, आपण भोगणाऱ्या सुख

नरदेहाचे महत्त्व

परमेश्वराने सारासारविवेकसंपन्न, सर्वोत्कृष्ट, दुर्लभ असा जो नरदेह दिला त्यात, प्रत्येक मानवाने स्वस्वरूपाचे

शंभरी ऋतुराजाची

ऋतुराज,ऋतुजा केळकर मी एक ‘साधी स्त्री’ जीवनाच्या आकडेमोडीत हरवलेली. संसार, लग्न, मुलं या साऱ्या घटना जशा एका

माणूस आणि मन

मर्थ रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक हे खूप प्रसिद्ध आहेत. मनाचे श्लोक माहीत नाहीत असा माणूस निराळाच. त्यांच्या

महर्षी याज्ञवल्क्य

कदा जनकराजाने आपल्या दरबारात शास्त्रचर्चेसाठी विद्वानांची सभा आयोजित केली होती. त्यावेळी त्याने घोषणा केली की