भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत एक हाती सत्ता मिळवत विजयी झालेल्या भाजपने ३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी डिंपल मेहता आणि ध्रुवकिशोर पाटील यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडे प्रचंड बहुमत असल्याने महापौर पदी डिंपल मेहता आणि उपमहापौर पदी ध्रुवकिशोर पाटील यांचा विजय निश्चित आहे.
मीरा-भाईंदर महापालिकेच्या ९५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने ७८ जागांवर विजय मिळवला आहे, तर काँग्रेसने १३ आणि शिवसेनेने ३ जागांवर विजय मिळवला होता, तर एक अपक्ष उमेदवार निवडून आला होता त्यानी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता भाजपची संख्या ७९ झाली आहे. शुक्रवारी महापौर पदासाठी डिंपल मेहता यांनी तर उपमहापौर पदासाठी ध्रुवकिशोर पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. डिंपल मेहता यांच्यासाठी नगरसेविका शानू गोहिल आणि स्नेहा पांडे सूचक व अनुमोदक आहेत, तर ध्रुवकिशोर पाटील यांच्यासाठी नगरसेवक संजय थेराडे आणि भगवती शर्मा सूचक व अनुमोदक आहेत.
काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येऊन मीरा-भाईंदर शहर विकास आघाडी स्थापन करून त्यांच्यावतीने काँग्रेसच्या रुबीना शेख यांनी महापौर पदासाठी तर शिवसेनेच्या वंदना विकास पाटील यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केले आहेत. ७९ विरुद्ध १६ अशी लढत असल्याने मीरा-भाईंदरच्या महापौरपदी डिंपल मेहता आणि उपमहापौर पदी ध्रुवकिशोर पाटील यांचा विजय निश्चित आहे. डिंपल मेहता यापूर्वी २०१७ मध्ये महापौर होत्या, तर ध्रुवकिशोर पाटील हे १९९९ पासून नियमित नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. सभागृहात ते ज्येष्ठ नगरसेवक आहेत.