पालघर : दळणवळण क्षेत्रात भारत आता एक मोठी झेप घेण्यास सज्ज झाला आहे. देशातील पहिले 'समुद्रातील विमानतळ' (Sea Airport) मुंबई जवळच्या पालघर जिल्ह्यात उभारले जाणार आहे. पालघरमधील प्रस्तावित वाढवण बंदराच्या क्षेत्रात, समुद्राच्या मधोमध एक कृत्रिम बेट तयार करून त्यावर हे भव्य विमानतळ बांधण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात आली आहे. सुमारे ४५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या या प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) प्रवासाचे चित्र बदलणार आहे. याचा सर्वाधिक फायदा मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमधील प्रवाशांना होणार असून, भविष्यातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मोठी मदत मिळणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या या संयुक्त प्रयत्नामुळे पालघर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार असून, यामुळे रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होणार आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा कॅनडाविरुद्ध कडक भूमिका घेतली आहे. यावेळी त्यांनी विमान वाहतूक क्षेत्रात मोठे आणि ...
वर्षाला ९ कोटी प्रवाशांचा भार पेलणार
वाढवण बंदर आणि महामार्गांच्या जाळ्यानंतर आता पालघर जिल्हा जागतिक नकाशावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. समुद्रात पूर्णतः कृत्रिम बेट तयार करून तिथे देशातील एक अवाढव्य विमानतळ उभारण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (MADC) सुरू केलेला पूर्व-व्यवहार्यता अभ्यास आता पूर्णत्वाकडे असून, लवकरच या प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष सुरू होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे एकूण ४५ हजार कोटींच्या खर्चापैकी २५ हजार कोटी रुपये केवळ समुद्रात जमिनीची पुनःप्राप्ती (Land Reclamation) करण्यासाठी खर्च केले जाणार आहेत. उर्वरित निधीतून अत्याधुनिक टर्मिनल, धावपट्ट्या आणि एअरसाईड सुविधा उभारल्या जातील. दरवर्षी ९ कोटी (९० दशलक्ष) प्रवाशांना हाताळण्याची क्षमता असलेले हे विमानतळ देशातील सर्वात मोठ्या विमानतळांपैकी एक असेल. या प्रकल्पामुळे केवळ प्रवास सोपा होणार नाही, तर पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे.
विमानतळ कसं असणार?
या विमानतळाची रचना दोन समांतर धावपट्ट्या (Parallel Runways) असलेली असेल, ज्यामुळे विमानांची एकाच वेळी ये-जा करणे अधिक सुलभ होईल. विशेष म्हणजे, हे विमानतळ देशातील एक प्रमुख 'हवाई मालवाहतूक केंद्र' (Cargo Hub) म्हणून विकसित केले जाणार असून, दरवर्षी ३ दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक हाताळण्याची याची अवाढव्य क्षमता असेल. या प्रकल्पाचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे याचे वाढवण बंदराशी असलेले थेट कनेक्शन. सर्व प्रकारच्या हवामानात कार्यरत राहणाऱ्या या खोल-पाणी बंदराशी विमानतळाचा एकात्मिक संबंध (Integrated Connectivity) जोडला गेल्यामुळे, रस्ते, समुद्र आणि हवाई मार्ग अशा तिन्ही स्तरांवरून मालाची जलद वाहतूक करणे शक्य होणार आहे. यामुळे उद्योगांना मोठा वेग मिळेल आणि हा परिसर लॉजिस्टिक्स क्षेत्रातील एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येईल.
बुलेट ट्रेन, मेट्रो आणि एक्सप्रेसवेची थेट एन्ट्री...
या प्रकल्पाच्या पूर्व-व्यवहार्यता अहवालात विमानतळाला मुंबई आणि गुजरातशी जोडण्यासाठी दळणवळणाचे एक भक्कम जाळे प्रस्तावित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हे विमानतळ थेट मुंबई-वडोदरा एक्सप्रेसवेशी जोडले जाणार असून, रस्ते प्रवासाचा वेळ कमालीचा वाचणार आहे. केवळ रस्तेच नव्हे, तर रेल्वे कनेक्टिव्हिटीवरही मोठा भर देण्यात आला आहे. मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) कॉरिडॉरशी हे विमानतळ जोडले जाणार असल्याने प्रवाशांना हाय-स्पीड प्रवासाचा पर्याय मिळेल. तसेच, पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी मेट्रो लिंकचा प्रस्ताव असून, यामुळे मुंबई, ठाणे आणि उपनगरातून विमानतळावर पोहोचणे अत्यंत सोपे होणार आहे. या अष्टपैलू कनेक्टिव्हिटीमुळे हा प्रकल्प केवळ विमानतळ न राहता 'ट्रान्सपोर्टेशन हब' ठरेल, अशी चिन्हे आहेत.