मीरा रोड : दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेमुळे मीवर भाईंदर येथे उभारण्यात आलेल्या तिसरा दुमजली उड्डाणपूल रचनेमुळे वादात अडकला होता.अखेर वाहतूक पोलिस आणि एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी या पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. चार मार्गिकेचा पूल पुढे थेट दोन मार्गिकेचा करण्यात आला. त्यामुळे वाहतूक कोंडी तर होईलच शिवाय भीषण अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मीरा-भाईंदर परिसरात मेट्रो-९ चे खांब उभारल्यानंतर रस्त्यांची रुंदी कमी झाली असून, वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएने परिसरात तीन दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी दोन पूल आधीच वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. तर जुना पेट्रोल पंप ते फाटक मार्गावरील आझाद मैदानदरम्यानचा सुमारे १८०० मीटर लांबीचा तिसरा पूल बांधकामाच्या अंतिम टप्प्यात आहे.
मात्र, या पुलाची रचना चार मार्गिकांवरून अचानक दोन मार्गिकांमध्ये येत असल्याने सोशल मीडियावरून तीव्र टीका सुरू झाली. वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करत, अपघातांची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी गुरुवारी पुलाची सखोल पाहणी केली. यावेळी एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
पाहणीनंतर वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुभाजकांची रचना, दिशादर्शक व सूचना फलक, वेग नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना आणि मार्ग स्पष्ट दिसण्यासाठी चिन्हांकन यांचा त्यात समावेश आहे. या सूचनांची अंमलबजावणी केल्यानंतरच पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे.
एमएमआरडीएने पुलाच्या रचनेत कोणताही धोका नसल्याचा दावा केला असून, भविष्यात भाईंदर पूर्व-पश्चिम जोडणीसाठी विस्तार करण्याच्या दृष्टीने ही रचना करण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, नागरिकांकडून होणाऱ्या टीकेनंतर आता अतिरिक्त सुरक्षात्मक उपायांवर भर दिला जात आहे.
सर्व अंतर्गत कामे आणि वाहतूक पोलिसांनी सुचवलेल्या उपाययोजना पूर्ण झाल्यानंतर हा दुमजली उड्डाणपूल फेब्रुवारी अखेरीस वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.