मुंबई : अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवली जाणार असल्याचे समजते. उद्या, शनिवारी सायंकाळी पाच वाजता त्यांचा शपथविधी होणार असून, त्यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रवादीच्या गोटात गेल्या काही तासांपासून घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे वृत्त आहे. शनिवारी विधिमंडळ गटनेता निवडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर सायंकाळी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी शुक्रवारी सुनेत्रा पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री या पदासाठी होकार दिल्याचे कळते.