कोल्हापूर : कोल्हापूर शहरात अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचा गंभीर प्रकार समोर आला असून या प्रकरणात करवीर पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासात पीडित मुलगी सध्या आठ महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
कोल्हापुरातील कळंबा येथील आयटीआय कॉलेजसमोरील सनशाईन कॅफे आणि निसर्ग लॉजमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. करवीर पोलिसांनी संशयित ओम संभाजी मुगडे (वय १९, रा. नरके कॉलनी, कळंबा) याला अटक केली. मे, जून व ऑगस्ट २०२५ या कालावधीत घडलेल्या या घटनांमुळे पीडित अल्पवयीन मुलगी आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे चौकशीत समोर आले.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलीला विश्वासात घेतल्यांनंतर मुलीने सांगितले की संबंधित तरुणाने पीडितेशी ओळख वाढवून तिला विवाहाचे आमिष दाखवले त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. या घटना काही महिन्यांच्या कालावधीतच घडल्याचे तपासात पुढे आले.
कुटुंबीयांना या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून संशयिताला अटक केली आहे. शुक्रवारी (३० जानेवारी) रोजी न्यायालयात हजर केले असून पुढील चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणाचा तपास संबंधित कलमांखाली करण्यात येत असून, पीडितेला वैद्यकीय व आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. घटनाक्रमाशी संबंधित इतर बाबींचीही चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.