अनिल अंबानी यांच्याशी संबंधित कंपन्यांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरण
नवी दिल्ली : रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्याशी संबंधित कंपन्यांविरुद्ध सुरू असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीचा भाग म्हणून १,८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची नवीन मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी जप्त केली. या कारवाईसह या प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणेने जप्त केलेल्या मालमत्तेचे एकूण मूल्य आता अंदाजे १२,००० कोटी रुपये झाले आहे. ही कारवाई रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (आरसीएफएल), रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड (आरसीएफएल), येस बँक घोटाळा तसेच रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडशी संबंधित कथित फसवणुकीच्या प्रकरणांशी संबंधित आहेत.
नवीन जप्तींमध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे बीएसईएस यमुना पॉवर, बीएसईएस राजधानी पॉवर आणि मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडमधील शेअरहोल्डिंगचा समावेश असल्याचे ईडीने म्हटले आहे. व्हॅल्यू कॉर्प फायनान्स अँड सिक्युरिटीज लिमिटेड यांच्याकडे असलेल्या १४८ कोटी रुपयांच्या बँक ठेवी आणि १४३ कोटी रुपयांच्या मिळकती तात्पुरत्या स्वरूपात जप्त करण्यात आल्या असल्याचे ईडीने सांगितले. कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी अंगराई सेथुरामन यांच्या नावावर असलेले एक निवासी घर आणि दुसरे वरिष्ठ कर्मचारी पुनीत गर्ग यांचे शेअर्स आणि म्युच्युअल फंडदेखील जप्त करण्यात आले आहेत. या जप्तीचे एकूण मूल्य १,८८५ कोटी रुपये असल्याचे ईडीने सांगितले.