ठाणे : शुक्रवारी संध्याकाळी गर्दीच्या वेळी पसरलेल्या धुरामुळे नागरिकांची घाबरगुंडी उडाली होती. मध्य रेल्वेवर भीतीचे वातावरणही निर्माण झाले. मोठ्या प्रमाणात पसलेल्या धुरामुळे काही काळ समोरचे दिसेनासे झाले होते, त्यामुळे रेल्वे वाहतूक ही मंद गतीने सुरू होती.
नेमकं घडलं काय?
आज संध्याकाळी मध्य रेल्वेवर ऐन गर्दीच्या वेळी अचानक धुराचे लोट पसरले आणि नागरिकांची तारांबळ उडाली. लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले कि हा धूर नेमका आहे कसला? तर हा धूर होता एका नाल्यात साचलेल्या कचऱ्याचा.
कायम गजबजाट असलेल्या ठिकाणी म्हणजेच कळवा आणि ठाणे या स्थानकांदरम्यान रुळावरील एका नाल्यातील कचऱ्याने पेट घेतला. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला. काही वेळातच संपूर्ण परिसर धुराने भरून गेला.
प्रवाशांची तारांबळ
संध्याकाळची वेळ असल्याने ट्रेनला प्रचंड गर्दी होती, अश्या वेळी हा प्रकार घडल्याने प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. रुळावर पसरलेला धूर इतका दाट होता की समोरचे काहीच दिसेनासे झाले, आग लागली आहे का ? किंवा काही अपघात झाला आहे याची कोणतीच कल्पना प्रवाश्यांना नव्हती. त्यामुळे अनेकांनी लोकलमधून खाली उतरण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत.तातडीने आग आटोक्यात आणली त्यामुळे कोणतीही भयंकर घटना टळली. आग भडकली असता प्रवाश्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता त्यामुळे आग कश्यामुळे लागली? याचा तपास रेल्वे प्रशासन करत आहे.
लोकल गाड्या खोळंबल्या
या आगीमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. कळव्याकडून ठाण्याकडे जाणाऱ्या आणि ठाण्याहून कल्याण- डोंबिवलीकडे जाणाऱ्या लोकल गाड्या सुमारे १५ ते २० मिनिटे उशिरा धावल्या. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला शिवाय मनस्तापही सहन करावा लागला