महाराष्ट्राच्या राजकारणातील एका धडाडीच्या आणि शिस्तप्रिय पर्वाचा गुरुवार २९ जानेवारी रोजी बारामतीच्या मातीत शेवट झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी जड अंतःकरणाने आपल्या वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला, तेव्हा उपस्थितांचा काळजाचा ठोका चुकला आणि संपूर्ण विद्या प्रतिष्ठान परिसर शोकसागरात बुडाला.
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार थांबवण्यात आला आहे. प्रचारसभेसोबतच रोड शो देखील थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अजित पवार यांच्या निधनामुळे उमेदवारांनी कुठल्याही प्राचरसभा आणि रोड शो घेऊ नयेत असा आदेश पक्षाकडून देण्यात आला आहे. त्याबदल्यात उमेदवारांनी घरोघरो जाऊन पत्रके वाटून निवडणूक लढवावी असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. तसेच निवडणूक जिंकल्यानंतरही कोणत्याही प्रकारची मिरवणूक न काढण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. अशातच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही तोंडावर आहेत. महापालिका निवडणुका अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्या पक्षासोबत लढण्याचा निर्णय घेतला होता मात्र, त्यांना म्हणावे तसे यश महापालिका निवडणुकीत मिळाले नाही. यामुळेच अजित पवार यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी कंबर कसली होती. २८ जानेवारी रोजी अजित पवार यांच्या तब्बल ४ सभा बारामतीत होणार होत्या. मात्र, त्यापूर्वीच विमान अपघात त्यांचा अकाली मृत्यू झाला.
अजित पवारांचा पाच दिवसांपूर्वी मराठवाड्याचा शेवटचा दौरा :
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे पाच दिवसांपूर्वीच मराठवाडा दौऱ्यावर आले होते. हिंद दी चादर श्री गुरुतेग बहादूर साहिबजी यांच्या शहिदी समागम कार्यक्रमासाठी २५ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता अजित पवार नांदेडच्या विमानतळावर दाखल झाले होते. मुख्यमंत्र्यांना येण्यासाठी वेळ असल्याने विमानतळावरील स्वागत स्वीकारून उपमुख्यमंत्री अजित पवार हे नांदेडच्या शासकीय विश्रामगृहाकडे रवाना झाले. तेथून दुपारी अडीच वाजता त्यांनी नांदेड येथील पवित्र सचखंड गुरुद्वारा येथे जाऊन दर्शन घेतले. त्या ठिकाणी त्यांचा मोठा सत्कार करण्यात आला. कार्यकर्ते व भाविकांशी चर्चा करून ते नांदेड येथील मोदी मैदान येथील कार्यक्रमाकडे रवाना झाले. त्या ठिकाणी त्यांनी १६ मिनिटे मराठी व हिंदीतून भाषण केले. श्री गुरुतेग बहादूर यांच्या बलिदानाचा वैशिष्ट्यपूर्ण उल्लेख करून त्यांनी अभ्यासपूर्ण भाषण केले. विशेष म्हणजे निवेदकांच्यावतीने त्यांना भाषणाअगोदरच मराठी आणि हिंदीतून या दोन्ही भाषेतून मनोगत व्यक्त करण्याची विनंती केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तो शब्द पाळत १६ मिनिटांचे भाषण केले.