सुप्रभात

बोलिले जे ऋषी । साच भावे वर्ताया ॥
झाडू संतांचे मारग। आडराने भरले जग ॥
उच्छेदाचा भाग । शेष ठरला तो सेवू ।|
अर्थ लोपली पुराणे। सनाश केला शब्दज्ञाने ॥
विषय लोभी मने। साधन हे बुडविले ॥
पिटू भक्तीचा डांगोरा । कळिकाळासी दरारा ॥ तुका म्हणे करा । जयजयकार आनंद ॥

 

संत तुकाराम हे भोगवत धर्माच्या इमारतीचा कळस आहेत. साडेतीनशे वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या अभंगवाणीतून स्वधर्माची ज्योत पेटविली. हतबल आणि संभ्रमित झालेल्या जनलोकांना सत्कार्याचा मार्ग दाखविला.
या अभंगात त्यांनी आपल्या जन्माचे प्रयोजन स्पष्टपणे सांगितले आहे. ते म्हणतात, "आम्ही स्वर्गलोकातले रहिवासी आहोत. लोकांच्या उद्धाराचे काम करण्यासाठीच आपला उन्म आहे. ऋषीमुनींनी धर्म, नीती, भक्ती यांचे जे मूळ तत्त्च सांगितले ते प्रत्यक्ष दाखवून त्याप्रमाणे वर्तन करावे, हेच आमच्या जीवनाचे परम ध्येय आहे. संत हेच आयुष्याचे खरे मार्गदर्शक असतात. आम्ही संतांच्या येण्याच्या मार्गावरची धूळ साफ करू. या जगात तर आडराने ठायी ठायी भरती आहेत. संताची कृपा म्हणजे आयुष्यातील आनंदाचा ठेवा. आम्ही त्यांचे शेष उच्छीष्टही सेवन करू. चुकीच्या अर्थनिष्पतीमुळे पुराणे निरुपयोगी झाली आहेत. केवळ शब्दांचे बुडबुडे उडविणाऱ्या पोकळ पांडित्याने ज्ञानाचे सर्व क्षेत्र बिघडवले आहे. मुखात भाषा पांडित्याची, पण मनातली विषयवासना, लोभ जराही कमी होत नाही. त्यांनी तर सर्व साधनेच नष्ट करून टाकली आहेत. ते पुढे म्हणतात, "म्हणून तर आम्हाला जन्म घ्यावा लागतो. आम्ही सर्वत्र परमेश्वराच्या भक्तीचा डोंगोरा पिटू, या भक्तिरंगात एवढी ताकद आहे, की प्रत्यक्ष कळिकाळालाही आमचा दरारा वाटतो.'


संत तुकोबारायांनी लोकजागृतीचे काम केले. यात शंकाच नाही. आपल्या कीर्तनांद्वारे संभ्रमित झालेल्या लोकांना त्यांनी उपदेश केला आणि कल्याणाचा मार्ग दाखविला. धर्माचे रक्षण करणे ही बाब त्यांना फार महत्त्वाची वाटत होती. प्रवृती आणि निवृत्ती ही धर्माची दोन अंगे आहेत. त्या दोन्ही अंगांचा सांभाळ करू असे त्यांनी म्हटले आहे. ज्ञान आणि कर्म या दोन्हीमधला, सर्व सामान्यांना पेलवणारा सहज, सोपा भक्तिमार्ग त्यांनी लोकांना दाखवला. लोकमानसात चैतन्य निर्माण केले. संतांच्या या समर्पित कार्यामुळेच मराठी मुलखात 'महाराष्ट्र धर्म' टिकून राहिला.

Comments
Add Comment

संसारी असावे सावध

जीवन संगीत,सद्गुरू वामनराव पै सर्ग, नियम व आपले कर्म यांचा आपल्या जीवनातील घडामोडींशी, आपण भोगणाऱ्या सुख

नरदेहाचे महत्त्व

परमेश्वराने सारासारविवेकसंपन्न, सर्वोत्कृष्ट, दुर्लभ असा जो नरदेह दिला त्यात, प्रत्येक मानवाने स्वस्वरूपाचे

शंभरी ऋतुराजाची

ऋतुराज,ऋतुजा केळकर मी एक ‘साधी स्त्री’ जीवनाच्या आकडेमोडीत हरवलेली. संसार, लग्न, मुलं या साऱ्या घटना जशा एका

माणूस आणि मन

मर्थ रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक हे खूप प्रसिद्ध आहेत. मनाचे श्लोक माहीत नाहीत असा माणूस निराळाच. त्यांच्या

महर्षी याज्ञवल्क्य

कदा जनकराजाने आपल्या दरबारात शास्त्रचर्चेसाठी विद्वानांची सभा आयोजित केली होती. त्यावेळी त्याने घोषणा केली की

संत नामदेव

देव दाखवी ऐसा नाही गुरु देव दाखवी ऐसा नाही गुरु। जेथे जाय तेथे दगड शेंदरू॥ देव दगडाचा बोलेल