बारामती : राजकारणाच्या आणि संसाराच्या प्रवासात ज्यांनी सावलीसारखी सोबत दिली, त्या आपल्या पतीला अजित पवारांना अखेरचा निरोप देताना सुनेत्रा पवार यांना आपला शोक आवरता आला नाही. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात पार्थिव अंत्यसंस्कारासाठी आणले असताना, सुनेत्रा वहिनींनी जड अंतःकरणाने अजितदादांचे शेवटचे दर्शन घेतले. नेहमी खंबीरपणे दादांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या वहिनींना या अवस्थेत पाहून उपस्थित कार्यकर्त्यांचेही डोळे पाणावले. अत्यंत शांत आणि संयमी असलेल्या सुनेत्रा पवारांचा तो हुंदका उपस्थितांच्या काळजाला घर पाडून गेला. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देणाऱ्या आपल्या जोडीदाराला दिलेला हा अखेरचा निरोप बारामतीकरांसाठी अत्यंत क्लेशदायक ठरला.
बारामतीच्या 'वाघा'ला निरोप देण्यासाठी मान्यवरांची मांदियाळी बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि खंबीर नेतृत्व अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण ...
ज्या मैदानावरून अजित पवारांनी विकासाची अनेक स्वप्ने पाहिली आणि पूर्ण केली, त्याच विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात आज त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विमान अपघाताच्या त्या दुर्दैवी बातमीने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला होता, परंतु आज जेव्हा दादांच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला, तेव्हा उपस्थित हजारो कार्यकर्त्यांच्या धैर्याचा बांध फुटला. सकाळपासूनच बारामतीकडे येणारे सर्व रस्ते जनसागराने फुलून गेले होते. पार्थिव अंत्यविधीसाठी आणले जात असताना 'अमर रहे अमर रहे, अजित दादा अमर रहे' आणि 'एकच वादा, अजित दादा' अशा घोषणांनी संपूर्ण परिसर भारून गेला होता. आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देताना कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दुःख आणि भविष्यातील पोकळीची चिंता स्पष्टपणे दिसत होती. सामान्य बारामतीकर असो वा लांबून आलेला कट्टर समर्थक, प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू आणि ओठांवर दादांच्या आठवणी होत्या.
अजित पवारांची निर्णयक्षमता आणि कार्यकर्त्यांशी असलेला थेट संवाद त्यांच्या निधनानंतरही लोकभावनेत जिवंत दिसला. बारामती आणि आसपासच्या खेड्यापाड्यातून आलेल्या नागरिकांनी तासनतास रांगेत उभे राहून आपल्या लोकनेत्याचे शेवटचे दर्शन घेतले. एका प्रभावी राजकीय पर्वाचा असा अंत होईल, अशी पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. या अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित असलेल्या अलोट गर्दीने हे सिद्ध केले की, राजकारणाच्या पलीकडे जाऊन अजित पवारांनी लोकांच्या मनात स्वतःचे एक हक्काचे घर निर्माण केले होते.