शिवसेनेच्या नेत्याने सर्व संभ्रम दूर केले
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक भाजप आणि शिवसेना युतीत लढवण्यात आली होती. या निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवत सत्ता स्थापन करण्यासाठी स्पष्ट बहुमत मिळवले आहे. मात्र कोणत्याही एका पक्षाला स्वतंत्र बहुमत न मिळाल्याने महापौरपद कोणाकडे जाणार, याबाबत शहरात जोरदार चर्चा सुरू होती. आता या चर्चांवर शिवसेनेच्या एका नेत्याने स्पष्ट भूमिका मांडत संभ्रमाला पूर्णविराम दिला आहे. निवडणुकीत शिवसेना ५३ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला असून भाजपने ५० जागा जिंकल्या आहेत. त्यानंतर भाजपकडून अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी करण्यात आली होती. मात्र या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी महापौरपदाबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.
लांडगे म्हणाले, “शिवसेना युतीतच राहणार आहे. आम्ही निवडणुका युतीत लढलो असलो तरी राजकारणात संख्येला महत्त्व असते. ज्या पक्षाची संख्या जास्त, त्याच पक्षाचा महापौर होणार, हे स्पष्ट आहे.” ज्या महापालिकेत शिंदे सेनेची संख्या अधिक आहे, त्या ठिकाणी शिंदे सेनेचाच महापौर होईल, असा दावा त्यांनी केला.
महापौर निवडीची प्रक्रिया :
महापौरपदाची निवडणूक ३ फेब्रुवारी रोजी होणार असून उमेदवारी अर्ज २९ व ३० जानेवारी रोजी भरले जाणार आहेत. त्या दिवशी महापौरपदाचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल, असेही लांडगे यांनी सांगितले. भाजपने कोणत्या पदांची मागणी केली आहे, याबाबत विचारले असता लांडगे म्हणाले की, “युतीतील पदवाटपाबाबत चर्चा सुरू आहे. याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण घेणार असून त्यानंतर अधिकृत घोषणा केली जाईल.” एकूणच संख्याबळ आणि युतीतील चर्चांवरून कल्याण-डोंबिवली महापालिकेतील महापौरपदाचा तिढा आता लवकरच सुटण्याची शक्यता आहे.