मंत्री नितेश राणे यांच्याकडून अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली
कणकवली : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या निधनाने जवळपास चारहून अधिक दशके महाराष्ट्राच्या समाजकारणात सेवा देणारे एक अजातशत्रू व्यक्तिमत्व हरपले आहे, अशा शब्दांत राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
अजितदादांच्या कार्याचा गौरव करताना नितेश राणे म्हणाले की, प्रशासनावर असलेली त्यांची पकड, सहकार क्षेत्राची जाण, निर्णयक्षमता आणि कामातील शिस्त तसेच जनसामान्यांसाठी अखंड झटण्याची वृत्ती यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले होते. राज्याच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले निर्णय, दाखवलेली कार्यतत्परता आणि जबाबदारीची जाणीव ही असंख्य कार्यकर्त्यांसाठी नेहमीच पथदर्शी ठरेल.
मंत्री नितेश राणे पुढे म्हणाले की, अजितदादांचे विचार, कार्य आणि त्यांच्या नेतृत्वाचा ठसा हा महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक इतिहासावर कायमस्वरूपी कोरला गेलेला आहे. त्यांच्या जाण्याने राज्याचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. श्री. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो तसेच या दुःखातून सावरण्याचे त्यांच्या कुटुंबीयांना बळ मिळो, अशी प्रार्थना त्यांनी ईश्वरचरणी केली आहे.