मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणावर दीर्घकाळ ठसा उमटवणारे, प्रशासनावर पकड असलेले आणि निर्णायक नेतृत्वासाठी ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांचा बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचारासाठी बारामतीकडे येत असताना ही दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात एक प्रभावी पर्व संपुष्टात आले आहे.
अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. बी.कॉम.पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी शेती व्यवसाय सांभाळत राजकारणात प्रवेश केला. लोकसभा सदस्य, सात वेळा विधानसभा सदस्य, विविध खात्यांचे कॅबिनेट मंत्री आणि अनेक वेळा उपमुख्यमंत्री अशी त्यांची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द राहिली. वित्त, नियोजन, ऊर्जा, जलसंपदा आणि ग्रामीण विकास यांसारखी महत्त्वाची खाती त्यांनी प्रभावीपणे हाताळली. त्यांच्या कार्यकाळात जल व्यवस्थापन, ऊर्जा प्रकल्प आणि आर्थिक नियोजनाला विशेष महत्त्व देण्यात आले. पहाटे लवकर उठून काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. सात वेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा विक्रम त्यांच्या नावावर असून प्रशासनावरील त्यांचा वचक आणि राजकारणातील दबदबा सर्वश्रुत होता.
राजकीय कारकीर्द
सहकार, शेती आणि ग्रामीण प्रश्नांच्या माध्यमातून अजित पवार राजकारणात सक्रिय झाले. बारामती परिसरात संघटनात्मक काम करत त्यांनी नेतृत्वाची ओळख निर्माण केली आणि अल्पावधीतच ते राज्य पातळीवरील प्रभावी नेते म्हणून उदयास आले. ते जून १९९१ ते सप्टेंबर १९९१ या कालावधीत लोकसभा सदस्य होते. त्यानंतर त्यांनी सात वेळा महाराष्ट्र विधानसभेत प्रतिनिधित्व केले. १९९१ ते १९९५, १९९५ ते १९९९, १९९९ ते २००४, २००४ ते २००९, २००९ ते सप्टेंबर २०१४, २०१४ ते २६ सप्टेंबर २०१९ आणि २०१९ ते २०२४ या कालखंडात ते आमदार राहिले. दीर्घकाळ बारामती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना जनसंपर्क, स्थानिक प्रश्नांची जाण आणि कामाची गती यासाठी ते ओळखले गेले.
ग्राम विकासावर दिला विशेष भर
जून १९९१ ते नोव्हेंबर १९९२ या काळात त्यांनी कृषी व ऊर्जा राज्यमंत्री म्हणून काम केले. त्यानंतर नोव्हेंबर १९९२ ते फेब्रुवारी १९९३ या कालावधीत पाणीपुरवठा, ऊर्जा व नियोजन राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. या काळात ग्रामीण विकास आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला. ऑक्टोबर १९९९ ते जुलै २००४ या कालावधीत त्यांनी पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण) आणि फलोत्पादन मंत्री म्हणून काम पाहिले. जुलै २००४ ते नोव्हेंबर २००४ दरम्यान ते ग्रामीण विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता तसेच पाटबंधारे मंत्री होते. नोव्हेंबर २००४ ते नोव्हेंबर २००९ या काळात त्यांनी जलसंपदा व स्वच्छता मंत्रीपद भूषवले, तर नोव्हेंबर २००९ ते नोव्हेंबर २०१० या काळात जलसंपदा व ऊर्जा मंत्री म्हणून काम केले. राज्यातील धरणे, कालवे, सिंचन प्रकल्प आणि पाणी व्यवस्थापनात त्यांनी सक्रिय भूमिका बजावली.
उपमुख्यमंत्री म्हणून दीर्घ अनुभव
नोव्हेंबर २०१० ते सप्टेंबर २०१२ आणि डिसेंबर २०१२ ते सप्टेंबर २०१४ या कालावधीत ते वित्त, नियोजन व ऊर्जा खात्यांसह उपमुख्यमंत्री होते. २३ ते २६ नोव्हेंबर २०१९ हा त्यांचा संक्षिप्त उपमुख्यमंत्री कार्यकाळ राहिला. त्यानंतर ३० डिसेंबर २०१९ ते २९ जून २०२२ या काळात ते पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. ४ जुलै २०२२ ते ३० जून २०२३ या काळात त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळली. २ जुलै २०२३ ते २८ जानेवारी २०२६ या कालावधीत ते पुन्हा उपमुख्यमंत्री होते.
सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान
राजकारणासोबतच त्यांनी शैक्षणिक, क्रीडा आणि सहकार क्षेत्रातही योगदान दिले. ते बारामती विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त होते. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणेचे सदस्य, रयत शिक्षण संस्था, सातारा यांचे संचालक आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सदस्य, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी दीर्घकाळ जबाबदाऱ्या सांभाळल्या. महानंद आणि महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे संचालक म्हणूनही ते कार्यरत होते.