मुंबई : राज्यातील किमान तापमानात चढ-उतार सुरूच असून थंडीची तीव्रता कमी-अधिक होत आहे. त्यातच मुंबई शहर आणि उपनगरांतील काही भागांमध्ये येत्या काळात तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २७ जानेवारी रोजी महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. हवामानातील बदलत्या स्थितीमुळे आकाशात ढगांची ये-जा वाढली असून, विशेषतः दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
जवळच अरबी समुद्र असल्यामुळे समुद्रातील आर्द्रतेचे प्रमाण वाढत असल्याने मुंबईत उकाड्याची तीव्रता काहीशी वाढली आहे. या उष्ण आणि दमट हवामानामुळे ढग निर्मितीस पोषक वातावरण तयार होत असून, त्याचा परिणाम म्हणून शहराच्या काही भागांत तुरळक पाऊस किंवा रिमझिम सरी पडू शकतात. दक्षिण मुंबई, पश्चिम उपनगरांतील काही परिसर तसेच मध्य रेल्वे मार्गालगतच्या भागांत अधूनमधून हलका पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु हा पाऊस सर्वत्र एकसारखा नसेल, तर तो स्थानिक स्वरूपाचा असण्याची अधिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुळे काही भागांत पावसाच्या सरी कोसळतील, तर काही भाग कोरडे राहू शकतात. या हलक्या पावसामुळे तापमानात किंचित घट जाणवू शकते आणि नागरिकांना उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळू शकतो.
दरम्यान, भारतात सक्रिय असलेल्या पश्चिमी चक्रावाताचा परिणाम आता राज्याच्या हवामानावरही जाणवण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. या बदलत्या स्थितीत आज राज्यातील काही भागांत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
तसेच अचानक होणाऱ्या पावसामुळे वाहनचालकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. रस्ते ओलसर झाल्यास वाहतुकीचा वेग मंदावू शकतो. तसेच बाहेरच्या कामांसाठी घराबाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे.