पुणे : पुण्यातील वाघोली परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका आईनेच आपल्या पोटच्या ११ वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एवढेच नाही, तर या क्रूर मातेने आपल्या १३ वर्षांच्या मुलीलाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने मुलगी या हल्ल्यातून बचावली असून तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. वाघोलीतील 'बाईफ रोड' परिसरात वास्तव्यास असलेल्या सोनी संतोष जायभाय (मूळ रा. कंधार, जि. नांदेड) या महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले. घरगुती कारणातून किंवा मानसिक तणावातून हे कृत्य घडले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या हल्ल्यात ११ वर्षीय साईराज संतोष जायभाय याचा जागीच मृत्यू झाला. मुलाची हत्या केल्यानंतर आरोपी महिलेने १३ वर्षांच्या धनश्री जायभाय हिच्यावरही प्राणघातक हल्ला चढवला. गंभीर जखमी झालेल्या धनश्रीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच लोणी कंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपी महिलेला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. एका आईनेच असं टोकाचं पाऊल का उचललं, या प्रश्नाने संपूर्ण पुणेकर सुन्न झाले आहेत.
भोपाळ : देशातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या 'एम्स' (AIIMS) रुग्णालयातून सुरक्षेला आव्हान देणारी एक अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे. रुग्णालयातील स्त्रीरोग ...
'त्या' पाषाणहृदयी मातेच्या कृत्याने पोलीसही सुन्न
अवघ्या दोन दिवसांत वाघोलीत ही दुसरी मोठी गुन्हेगारी घटना घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. आरोपी आईने आपल्या मुलाची हत्या केल्यानंतर घराच्या पांढऱ्याशुभ्र फरशीवर पडलेले रक्ताचे डाग या घटनेच्या भीषणतेची साक्ष देत आहेत. या घटनेमुळे पुण्याच्या पूर्व भागातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लोणी कंद पोलिसांनी आरोपी महिलेला तात्काळ ताब्यात घेतले आहे. मात्र, तिने आपल्या पोटच्या गोळ्यावर वार का केले? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. हा प्रकार कौटुंबिक वादातून घडला की संबंधित महिला काही मानसिक तणावाखाली होती, या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. वाघोली परिसरात सातत्याने वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे सर्वसामान्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे.