बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात आदिवासींच्या बेकायदा घरांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईचा विरोध करण्यासाठी आदिवासी समाजाने मोठी गर्दी करत पोलिसांवर दगडफेक केली. या सगळ्या गोंधळामुळे आज म्हणजेच मंगळवार २७ जानेवारी रोजी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (नॅशनल पार्क) बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. उद्यानाच्या मुख्य दारावर बॅरिगेटिंग केले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे.
जनतेच्या निषेधानंतर, पोलिस पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले. पोलिस कारवाईचा निषेध करण्यात महिलांचा सहभाग मोठ्या संख्येने असल्याचे समोर आले आहेत. जनतेच्या तीव्र निषेधाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा पोलिस पथक मागे हटू लागले तेव्हा काही लोक दगड उचलताना दिसले. घटनेदरम्यान दगडफेकही झाली. परिणामी, बेकायदेशीर कब्जा हटवता आला नाही.
नेमकं प्रकरण काय ?
१९९५ च्या आधीपासून राहणाऱ्या आदिवासींना संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये राहण्यास परवानगी आहे. त्यानंतर राहायला आलेल्या आदिवासींना घरे देऊन त्यांना पुनर्विकासाचा लाभ मिळाल्याचे प्राशाशणाचे म्हणणे आहे. मात्र, असं असूनही पुन्हा एकदा काही जणांकडून अतिक्रमण करण्यात आले आणि त्यावर कारवाई करण्यात आल्याचं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
या सर्व प्रकरणावर वनमंत्री गणेश नाईक यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की; "बोरिवलीत काही घटकांना घरं दिलीत, काहींना राहिली आहेत. यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, त्यासाठी बैठक आहे, मला दगडफेकीसंदर्भात माहिती नाही त्यासंदर्भात मी माहिती घेतो. नॅशनल पार्क हा अतिशय सेन्सेटिव्ह विषय आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झोपडपट्टी काढण्याचे हे आदेश देण्यात आले आहेत."