नवी दिल्ली : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी नवी दिल्लीत कर्तव्यपथावर संचलनाचे अर्थात परेडचे आयोजन करण्यात आले होते. या संचलनात महाराष्ट्रासह एकूण १७ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे तसेच १३ केंद्रीय विभागांचे चित्ररथ सहभागी झाले. या व्यतिरिक्त भूदल, नौदल, हवाई दल, देशातील केंद्रीय निमलष्करी दले यांचाही संचलनात सहभाग होता. स्वदेशी धनुष तोफ तसेच टी ९० भीष्म रणगाडा, अर्जुन एम के १ मेन बॅटल टँक, नाग मिसाइल, मार्क २ चीही झलक दिसली. संचलनाचा समारोप हवाई दलाच्या विमानांच्या ताफ्याने दिल्लीच्या आकाशात चित्तथरारक कसरती करत केला.
परेड अर्थात संचलनाच्या माध्यमातून देशाचे सामर्थ्य, समृद्ध सांस्कृतिक वारसा, प्रगती, लष्करी पराक्रम यांचे प्रतिबिंब दिसले. भारताच्या वाढत्या लष्करी सामर्थ्याची झलक दिसली.
'स्वातंत्र्याचा मंत्र : वंदे मातरम् आणि समृद्धीचा मंत्र : आत्मनिर्भर भारत ' या संकल्पनेअंतर्गत कर्तव्य पथावर ३० चित्ररथ आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण झाले. बंकिमचंद्र चटर्जींची रचना असलेले भारताचे राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम्' ला दिडशे वर्ष झाल्याच्या निमित्ताने केंद्र सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय विशेष चित्ररथ घेऊन परेडमध्ये सहभागी झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कार्यक्रमाची पाहणी केली.
चित्ररथांच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे, सांस्कृतिक विविधतेचे आणि विविध क्षेत्रांमधील स्वावलंबनाकडे होणाऱ्या प्रगतीचे दृश्य वर्णन सादर करण्यात आले. ज्यामध्ये हस्तकला आणि लोक परंपरांपासून ते स्वावलंबन, नवोन्मेष, संरक्षण तयारी आणि राष्ट्र उभारणी उपक्रमांपर्यंतच्या विषयांचा समावेश होता. परेडमध्ये सैनिकांच्या तुकड्या सहभागी झाली. लष्करी बँड पथके आकर्षक धून वाजवत परेडमध्ये सहभागी झाली.
महाराष्ट्राच्या चित्ररथाची गणेशोत्सव ही संकल्पना होती. या निमित्ताने दिल्लीत गणपती बाप्पा मोरया हा गजर घुमला. महाराष्ट्राचा चित्ररथ येताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल यांनी टाळ्या वाजवून कौतुक केलं.
युरोपियन कौन्सिलचे प्रेसिडेंट अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन युनियनच्या प्रेसिडेंट उर्सुला वॉन डेर लेयन हे २०२६ च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. परंपरेनुसार, राष्ट्रध्वज फडकवण्यात आला, त्यानंतर राष्ट्रगीत आणि स्वदेशी १०५-मिमी लाईट फील्ड गन वापरून २१ तोफांची सलामी देण्यात आली. दरवर्षीप्रमाणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन लाल किल्ल्यावर आले. राष्ट्रपती, विशेष अतिथी आणि पंतप्रधान आणि इतर मान्यवर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत परेड झाली.
जागतिक अॅथलेटिक पॅरा चॅम्पियनशिपचे विजेते, नैसर्गिक शेती करणारे शेतकरी, पीएम स्माइल योजनेअंतर्गत पुनर्वसन केलेले ट्रान्सजेंडर आणि भिकारी, गगनयान, चांद्रयान इत्यादी अलीकडील इस्रो मोहिमांमध्ये सहभागी असलेले सर्वोत्तम कामगिरी करणारे शास्त्रज्ञ/तांत्रिक व्यक्ती, राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनमध्ये SIGHT (स्ट्रॅटेजिक इंटरव्हेंशन फॉर ग्रीन हायड्रोजन ट्रान्झिशन) कार्यक्रमांतर्गत हायड्रोजन उत्पादन आणि इलेक्ट्रोलायझर उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळालेल्या कंपन्यांचे प्रमुख/सीईओ आणि प्रमुख प्रकल्पांमध्ये काम करणारे डीआरडीओचे सर्वोत्तम कामगिरी करणारे शास्त्रज्ञ/तांत्रिक व्यक्ती आदी दहा हजार मान्यवर विशेष आमंत्रणाचा मान राखत परेड बघण्यासाठी उपस्थित होते.