भारतीय नागरिकासह चार जणांचा मृत्यू
अटलांटा : अमेरिकेतील जॉर्जिया राज्यात कथित कौटुंबिक वादातून झालेल्या गोळीबाराच्या घटनेत एका भारतीय नागरिकासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली असून, संशयित आरोपीने पत्नी आणि इतर तीन नातेवाइकांवर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. अटलांटा येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, “कौटुंबिक वादातून झालेल्या गोळीबारात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला. संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून शोकाकुल कुटुंबाला सर्व आवश्यक मदत दिली जात आहे,” असे नमूद करण्यात आले आहे. संशयित आरोपीचे नाव विजय कुमार (वय ५१) असून तो अटलांटाचा रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीमू डोग्रा (४३), गौरव कुमार (३३), निधी चंदर (३७) आणि हरीश चंदर (३८) अशी मृतांची नावे आहेत. शुक्रवारी ब्रूक आयव्ही कोर्ट परिसरातील ब्लॉकमधून पोलिसांना फोन आला. घटनास्थळी पोहोचल्यावर घराच्या आत चार प्रौढ व्यक्तींचे मृतदेह आढळले. सर्वांचा मृत्यू गोळी लागल्यामुळे झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. गोळीबाराच्या वेळी घरात तीन मुले उपस्थित होती. गोळीबार सुरू होताच ही मुले घरातील कपाटामध्ये लपून बसली होती. यापैकी एका मुलाने ९११ क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली, त्यामुळे काही मिनिटांतच पोलीस घटनास्थळी पोहोचू शकले.
सुदैवाने, तिन्ही मुलांना कोणतीही दुखापत झालेली नसून त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.