नवी दिल्ली : गावांमधील प्रशासकीय कामे अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने ‘पंचम’ हा विशेष व्हॉट्सअॅप चॅटबॉट लाँच केला आहे. आता घरबसल्या मोबाईलवर ग्रामपंचायतीशी संबंधित कामे आणि योजनांची माहिती मिळवणे शक्य होणार आहे.
केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने ग्रामपंचायतींना सक्षम करण्याच्या उद्देशाने 'पंचम' हा चॅटबॉट आज लाँच केला आहे. ग्रामपंचायतींसाठी एक 'डिजिटल सोबती' म्हणून याची रचना करण्यात आली आहे. हा चॅटबॉट दैनंदिन प्रशासकीय कामात मदत करण्यासोबतच मार्गदर्शन आणि महत्त्वाची माहिती सुलभपणे पोहोचवण्याचे काम करेल. 'पंचम' केंद्र सरकार आणि देशभरातील ३० लाखांहून अधिक निवडून आलेले प्रतिनिधी व पंचायत पदाधिकारी यांच्यात थेट डिजिटल संपर्क साधणार आहे.
ग्रामीण भागात व्हॉट्सअॅपचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो, ही बाब लक्षात घेऊनच ही सेवा व्हॉट्सअॅपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी कोणतेही नवीन अॅप डाऊनलोड करण्याची किंवा शिकण्याची गरज नाही. एखाद्या व्यक्तीशी चॅटिंग करावे, इतक्या सोप्या पद्धतीने नागरिकांना माहिती मिळेल.
'पंचम' ई-ग्राम स्वराजशी संबंधित लाइव्ह डेटा, पंचायत अधिकारी आणि निवडून आलेल्या सदस्यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करतो. हा चॅटबॉट ई-ग्राम स्वराज, एलजीडी, जीपीडीपी आणि मंत्रालयाच्या प्रमुख योजना व उपक्रमांशी संबंधित माहिती देईल. सध्या हा चॅटबॉट एआय आधारित चॅटबॉट्ससारखा काम न करता, आधीच फीड केलेल्या निश्चित माहितीच्या आधारे उत्तरे देईल. ही माहिती सतत अपडेट केली जाईल. सामान्य नागरिक विविध दाखले, प्रमाणपत्रे, सरकारी योजना आणि महत्त्वाच्या सरकारी कामांची माहिती मिळवण्यासाठी पंचमचा वापर करू शकतील. ग्रामपंचायत सदस्यांना आणि अधिकाऱ्यांना योजना, सर्वेक्षणे, प्रशिक्षण साहित्य आणि अधिकृत मंत्रालयाच्या सूचना थेट उपलब्ध होतील.