मुंबई : कर्तव्यावर असताना मद्यपान करणाऱ्या एसटीच्या चालक व इतर कर्मचाऱ्यांना कोणतीही तडजोड न करता तातडीने निलंबित करण्याचे सक्त निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
आज मुंबईतील परळ बसस्थानकाला दिलेल्या अचानक भेटीदरम्यान मंत्री सरनाईक यांनी चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांची पाहणी केली. यावेळी विश्रांतीगृहांमध्ये अनेक ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या, तसेच काही कर्मचाऱ्यांकडून मद्यपान केल्याची दुर्गंधी येत असल्याचे निदर्शनास आले. या गंभीर प्रकारामुळे संतप्त झालेल्या मंत्री सरनाईक यांनी तेथे उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले, “परगावी कर्तव्य बजावणाऱ्या चालक-वाहकांसाठी विश्रांतीगृहांमध्ये उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मात्र, अशा ठिकाणी मद्यपानासारखे निंदनीय कृत्य घडत असेल, तर ते केवळ शिस्तभंग नाही तर प्रवाशांच्या जीवाशी थेट खेळ करणारे अत्यंत धोकादायक कृत्य आहे.”
“मद्यपान करून कर्तव्यावर जाणारा कर्मचारी केवळ अपघाताला निमंत्रण देत नाही, तर एसटीच्या सुरक्षित व विश्वासार्ह प्रवासावरही प्रश्नचिन्ह निर्माण करतो. अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांना चौकशीअंती सेवेतून बडतर्फ केले पाहिजे,” असा इशाराही त्यांनी दिला. मात्र, अशा प्रकारांना वेळीच आळा न घालणारे अकार्यक्षम अधिकारीही तितकेच जबाबदार असल्याचे स्पष्ट करत मंत्री सरनाईक म्हणाले की, एसटीचे सुरक्षा व दक्षता खाते आणि संबंधित अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळेच अशा बेशिस्त वर्तनाला खतपाणी मिळते. त्यामुळे संबंधित सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यापुढे कर्तव्यावर जाणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची, विशेषतः चालकांची ब्रेथ ॲनालायझरद्वारे चाचणी अनिवार्य करण्यात यावी. चाचणीत दोष आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याचे आदेशही मंत्री सरनाईक यांनी दिले. तसेच आज आढळून आलेल्या गैरप्रकारांबाबत स्वतंत्र विभागीय चौकशी समिती नेमून, अहवालाच्या आधारे दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. या दौऱ्यात मंत्री सरनाईक यांनी बसस्थानकातील स्वच्छता, प्रसाधनगृहे आणि बसेसच्या नियोजनाचीही पाहणी केली. प्रवाशांच्या सुरक्षितता व सुखसुविधांबाबत अधिक दक्ष राहण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.