आठ जणांचा मृत्यू; ८२ बेपत्ता
जकार्ता : इंडोनेशियातील जावा या बेटाला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. शनिवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास झालेल्या भूस्खलनात आठ जणांचा मृत्यू झाला असून, ८२ जण बेपत्ता झाले आहेत. सध्या बेटावर बचावकार्य सुरू आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम जावा प्रांतातील पश्चिम बांडुंग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. सततच्या पावसामुळे काही भागात भूस्खलन झाले असून, जावा परिसरातील ३४ घरे चिखल, दगडाखाली गेली आहेत. या भूस्खलनात आठ जणांचा मृत्यू झाला असून, ८२ जण बेपत्ता आहेत. अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली असल्याची भीती व्यक्त केली आहे. बचाव पथकांच्या मदतीने बेपत्ता नागरिकांचा शोध घेतला जात आहे. या दुर्घटनेत २४ जण थोडक्यात बचावले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे प्रवक्ता अब्दुल मुहरी यांनी दिली.
भूस्खलानामुळे पासिर कुनिंग या लहान गावात पहाटे तीनच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे आठ जणांचा मृत्यू झाला. बचाव पथकांना आठ नागरिकांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. संपूर्ण गाव चिखल, दगड आणि उन्मळून पडलेल्या झाडांखाली झाकले गेले. मुसळधार पाऊस आणि सैल झालेली जमीन यामुळे बचाव कार्यात अडचण येत असल्याची माहिती पश्चिम जावाच्या आपत्कालीन व्यवस्थापन कार्यालयाचे प्रमुख टेटेन अली मुंगकू एंगकुन यांनी दिली.