मुंबई : मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेना महायुतीचा महापौर बसणार हे आता जवळपास निश्चित झाले असून तसे झाल्यास सभागृह नेतेपद हे भाजपकडे येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तसे झाल्यास महापालिकेच्या सभागृहनेते पदी कोण असणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात असले तरी या पदासाठी प्रभाकर शिंदे यांच्यासह गणेश खणकर यांचेही नाव आता चर्चेत आहे. प्रभाकर शिंदे यांची वर्णी स्थायी समिती अध्यक्षपदी लागल्यास अभ्यासू आणि राजकीय टीकेचा समाचार घेण्यासाठी संभाव्य विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर यांच्यासमोर खणकर यांचे आव्हान उभे केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे ८९ नगरसेवक निवडून आले आहेत. मुंबई महापालिकेतील भाजप हा मोठा पक्ष असल्याने या पक्षाच्या महापौर बनल्यास याच पक्षाचा गटनेचा हा सभागृह नेता म्हणून निवडला जाऊ शकतो. त्यामुळे या सभागृह नेते पदासाठी माजी सभागृह नेते आणि भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, प्रभाकर शिंदे यांनी यापूर्वी सभागृह नेतेपद भूषवलेले असल्याने या पदावर पुन्हा त्यांची नेमणूक केली गेल्यास स्थायी समिती अध्यक्षपद कोणाला द्यावे यावरून पक्षाची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता महापालिकेच्या सभागृह नेतेपदी भाजपचे प्रवक्ते आणि भाजपचे महामंत्री गणेश खणकर यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. गणेश खणकर हे यापूर्वी स्वीकृत नगरसेवक होते आणि त्यांनी महापालिकेच्या सभागृहामध्ये सहभाग घेतलेला आहे. सभागृहाचे कामकाज त्यांना प्रचलित आहे आणि पक्षाचे प्रवक्ते असल्याने आणि त्यांची अभ्यासूवृत्ती लक्षात घेता सभागृह नेते पदी खणकर यांची निवड केली जाण्याची दाट शक्यता आहे. संभाव्य विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर यांच्या अभ्यासपूर्ण तसेच राजकीय टीकेचा समाचार खणकर चांगल्या प्रकारे घेऊ शकतात. त्यामुळे सभागृह नेते पदासाठी प्रभाकर शिंदे यांना गणेश खणकर हे पर्याय ठरू शकतात, असे दिसून येत आहे.
या पदासाठी प्रभाकर शिंदे हे योग्य उमेदवार असले तरी स्थायी समिती अध्यक्षपदासाठी एवढ्या क्षमतेचा नगरसेवक कोण असा प्रश्न पक्षापुढे निर्माण होऊ शकतो. या पदासाठी मकरंद नार्वेकर यांच्याही नावाची चर्चा असली तरी समितीचे कामकाज योग्य दृष्टीने हाताळण्याचा दृष्टिकोनातून तसेच एकाच कुटुंबात अनेक पदे दिली गेली अशा प्रकारची भावना कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यामध्ये निर्माण होऊ नये यासाठी नार्वेकर यांचे नाव मागे पडले जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे तसे झाल्यास नार्वेकर यांना स्थायी समितीचे अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता फारच कमी मानली जात आहे. मात्र याचबरोबर प्रभाकर शिंदे यांना जर स्थायी समिती अध्यक्षपद न देता सभागृह नेतेपदी निवड केल्यास स्थायी समितीवर अनुभवी सदस्य सदस्याला अध्यक्ष बनवण्याच्या दृष्टिकोनातून राजेश्री शिरवडकर किंवा हरिश भांदिर्गे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. राजेश्री शिरवडकर महापौर झाल्यास हरिश भांदिर्गे यांचाही विचार होऊ शकतो.