मुंबई : मुंबईच्या विलेपार्ले (पूर्व) परिसरातील ज्या कारखान्यामुळे या उपनगराला एक वेगळी ओळख मिळाली, तो पार्ले प्रॉडक्ट्सचा मूळ कारखाना आता कायमचा बंद होणार आहे. गेली ८७ वर्षे या परिसरात दरवळणारा पार्ले-जी बिस्किटांचा तो खास सुगंध आता लवकरच थांबणार असून, या जागेचा वापर आता नव्या स्वरूपात केला जाणार आहे. कंपनीने या मोक्याच्या जागेवर एक भव्य व्यावसायिक संकुल (Commercial Complex) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. १९३९ पासून सुरू झालेल्या या कारखान्याने अनेक पिढ्यांचे बालपण समृद्ध केले. मात्र, काळानुसार बदलताना कंपनीने आता या ऐतिहासिक जागेवर व्यावसायिक प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले आहे. विलेपार्ले रेल्वे स्थानकाजवळ असलेला हा कारखाना केवळ उत्पादनाचे केंद्र नसून मुंबईच्या औद्योगिक इतिहासाचा एक महत्त्वाचा वारसा होता. या निर्णयामुळे जुन्या मुंबईकरांमध्ये हळहळ व्यक्त होत असली, तरी या जागेवर आता आधुनिक काचेच्या इमारतींचे साम्राज्य पाहायला मिळणार आहे.
ठाणे : ऑनलाईन गुंतवणूक आणि घरबसल्या कामाच्या आमिषातून फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून ठाणे शहरात असाच एक गंभीर प्रकार समोर आला आहे. सोशल ...
२१ जुन्या इमारतींच्या पाडकामाला सुरुवात
विलेपार्ले (पूर्व) येथील पार्ले-जी बिस्किट कारखान्याच्या पुनर्विकासाच्या प्रक्रियेला आता वेग आला असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्य पर्यावरण परिणाम मूल्यांकन प्राधिकरणाने (SEIAA) ७ जानेवारी रोजी हिरवा कंदील दाखवला आहे. या मंजुरीनुसार, कारखान्याच्या परिसरातील २१ जुन्या वास्तू जमीनदोस्त करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सुमारे ३,९६१.३९ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणारा हा प्रकल्प मुंबईतील सर्वात महागड्या व्यावसायिक प्रकल्पांपैकी एक ठरणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प सुमारे १३.४५ एकर (५४,४३८.८० चौरस मीटर) इतक्या मोठ्या आणि मोक्याच्या भूखंडावर उभा राहत आहे. या जागेवर एकूण १,९०,३६०.५२ चौरस मीटर इतके अवाढव्य बांधकाम क्षेत्र विकसित करण्याचा मानस कंपनीने व्यक्त केला आहे. या प्रकल्पाच्या एफएसआय (FSI) गणिताचा विचार केल्यास, प्रस्तावित बांधकामापैकी १.२१ लाख चौरस मीटर क्षेत्र एफएसआयअंतर्गत असेल, तर ६८ हजार चौरस मीटर क्षेत्र नॉन-एफएसआय अंतर्गत विकसित केले जाणार आहे. या प्रकल्पाची प्रक्रिया २०२५ च्या मध्यावधीत सुरू झाली असून, कंपनीने मुंबई महापालिकेकडे सादर केलेल्या प्रस्तावाला आता पर्यावरण मंत्रालयाकडून अंशतः मंजुरी मिळाली आहे.
विलेपार्लेत आकाराला येणारं चार इमारती, अत्याधुनिक पार्किंग टॉवर्स अन्...
विलेपार्ले येथील पार्ले-जी कारखान्याच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या पुनर्विकास प्रकल्पाची रूपरेषा आता स्पष्ट झाली आहे. या भव्य संकुलात एकूण चार इमारती बांधण्यात येणार असून, यामध्ये व्यावसायिक कार्यालयांसह दोन स्वतंत्र पार्किंग टॉवर्सचा समावेश असेल. विमानतळाच्या जवळ असलेल्या या मोक्याच्या जागेवर बांधकामासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) उंचीचे नियम पाळून परवानगी दिली आहे. या नवीन प्रकल्पामुळे विलेपार्ले पूर्व परिसराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे. वाढत्या गाड्यांची संख्या लक्षात घेता, प्रकल्पात तीन आणि सहा मजली असे दोन स्वतंत्र पार्किंग टॉवर्स असतील. तसेच प्रस्तावित चारही इमारतींना दोन स्तरांचे तळमजले (Basement) दिले जाणार आहेत. पहिल्या इमारतीच्या 'बी-विंग'मध्ये तळमजला, सातवा आणि आठवा मजला हा खास रिटेल दुकाने आणि कॉर्पोरेट कार्यालयांसाठी राखीव असेल. विमानतळाच्या 'एअर फनेल झोन'मध्ये हा भूखंड येत असल्याने, विमानतळ प्राधिकरणाने इमारतींची कमाल उंची ३०.४० मीटरपर्यंत मर्यादित ठेवली आहे. केवळ ऑफिसच नाही, तर नागरिकांच्या मनोरंजनासाठी या संकुलात मोठी किरकोळ दुकाने (Retail Shops), अलिशान रेस्टॉरंट्स आणि एक भव्य फूड कोर्ट देखील असणार आहे.
'मियावाकी' पद्धतीने १,२०३ नवीन झाडे लावून वृक्षसंपदा वाढवण्यावर भर
विलेपार्ले येथील पार्ले-जी कारखान्याचा पुनर्विकास केवळ सिमेंट-काँक्रीटपुरता मर्यादित नसून, तिथे हिरवाईचा मोठा पट्टा निर्माण केला जाणार आहे. राज्य पर्यावरण परिणाम मूल्यांकन प्राधिकरणाने (SEIAA) दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पात पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी जपानच्या प्रसिद्ध 'मियावाकी' तंत्रज्ञानाचा वापर करून १,२०३ नवीन झाडांची लागवड केली जाणार आहे. यामुळे कारखान्याचा परिसर भविष्यात अधिक प्रदूषणमुक्त आणि निसर्गरम्य होणार आहे. या परिसरात सध्या एकूण ५०८ झाडे आहेत. पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी त्यापैकी ३११ झाडे मूळ जागेवरच जतन केली जातील, तर ६८ झाडांचे योग्य पद्धतीने स्थलांतर केले जाणार आहे. अपरिहार्य कारणास्तव १२९ झाडे तोडली जातील. 'मियावाकी' पद्धतीने १,२०३ नवीन झाडे लावून वृक्षसंपदा वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील झाडांची एकूण संख्या ५०८ वरून थेट २,२३० वर पोहोचेल, ज्यामुळे हा भाग विलेपार्लेचे 'ऑक्सिजन हब' ठरू शकेल.