पुणे : भवानी पेठ परिसरात बॅनर लावण्यावरून झालेला वाद हाणामारीत रूपांतरित झाला. या घटनेत भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका मृणाल कांबळे यांचा भाऊ शंतनू उर्फ बापू यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. खडक पोलिसांनी १४ ते १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. शंतनू यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. गुरुवारी (२२ जाने.) दुपारी सुमारे ३.३० वाजता काशेवाडी परिसरात निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर कांबळे समर्थकांकडून मतदारांचे आभार मानण्यासाठी बॅनर लावण्याचे काम सुरू होते. त्यावेळी प्रभागातील नवनिर्वाचित नगरसेविका अर्चना पाटील यांचे पती तुषार यांचे समर्थक घटनास्थळी आले व त्यांनी बॅनर लावू नये असे सांगितले. यावरून वाद वाढला आणि जमावाने शंतनू यांच्यावर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, अशी तक्रार आहे. पुन्हा त्या भागात बॅनर लावल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोपही आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल कदम करत आहेत. संबंधित परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाही नोंदवण्यात येत आहेत.