मुंबई : माघ महिन्यातील शुक्ल पंचमीला साजरी होणारी वसंत पंचमी हा हिंदू धर्मातील विशेष मानाचा दिवस मानला जातो. पंचांगानुसार यंदा हा उत्सव २३ जानेवारी २०२६ रोजी साजरा होणार आहे. विद्या, बुद्धी, वाणी आणि कलेची अधिष्ठात्री देवी सरस्वती यांच्या उपासनेसाठी हा दिवस अत्यंत शुभ समजला जातो. तसेच वसंत ऋतूच्या आगमनाचं प्रतीक म्हणूनही या दिवसाला महत्त्व आहे.
वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची पूजा कशी करावी?
वसंत पंचमीच्या दिवशी विद्येची देवी सरस्वती मातेची पूजा अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते. सनातन परंपरेनुसार माता सरस्वतीची अशी साधना केल्यास साधकाला विद्या, बुद्धी, वाणीची शुद्धता, स्मरणशक्ती आणि कलांमध्ये सिद्धी प्राप्त होते, असे म्हणतात.
सरस्वती पूजनाचा शुभ मुहूर्त : सकाळी ०७:१५ वाजेपासून ते दुपारी १२:५० वाजेपर्यंत असेल
स्नान: वसंत पंचमीची पूजा करण्यासाठी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर स्नान करा.
वस्त्र: वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवीला प्रिय असणारऱ्या पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे.
आसन: सरस्वती देवीची पूजा पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाच्या आसनावर बसून करावे.
स्थान: वसंत पंचमीच्या दिवशी ईशान्य कोपऱ्यात किंवा देवघर स्वच्छ करून तेथे चौरंग मांडा आणि त्यावर पिवळ्या रंगाचे कापड अंथरावे. त्यावर सरस्वती देवीची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करावी.
संकल्प: सरस्वती देवीच्या पूजेला आरंभ करण्यासाठी उजव्या हातात पाणी, अक्षता आणि फुल घेऊन संकल्प करावा.
संकल्प करण्यासाठी पुढील मंत्र म्हणावा.
“मम सर्वविद्या-बुद्धि-विवेक-वाक्शुद्धि-सिद्ध्यर्थं श्रीसरस्वतीदेव्याः पूजनं करिष्ये.
ध्यान: सरस्वती देवीच्या पूजेमध्ये तिला आवाहन करण्यासाठी किंवा ध्यान करण्यासाठी खालील मंत्र म्हणावा...
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना
या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा
सरस्वती देवीचे पूजन कसे करावे?
ध्यान मंत्रानंतर माता सरस्वतीला पुष्प, हळद-कुंकू, चंदन, अक्षता, धूप आणि दीप अर्पण करावे.माता सरस्वतीच्या चरणी पुस्तके, लेखणी, वाद्ये इत्यादी ठेवून प्रणाम करावा.फळे आणि नैवेद्य अर्पण करून स्तोत्रपठण किंवा पुढील मंत्रांचा जप करावा: ॐ ऐं सरस्वत्यै नमः किंवा ॐ ऐं ह्रीं क्लीं सरस्वत्यै नमःवसंत पंचमीच्या दिवशी आरती केल्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते, म्हणून आरती अवश्य करावी.
वसंत पंचमी कोणत्या कार्यांसाठी शुभ आहे?
विद्यारंभ संस्कार (लहान मुलांना अक्षरज्ञानाची सुरुवात) करण्यासाठी वसंत पंचमीचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.गीत, संगीत, नृत्य, लेखन आणि कला साधनेची सुरुवात करण्यासाठी वसंत पंचमीचा दिवस फलदायी आहे.कोणत्याही नवीन कार्याची किंवा मंगल कार्याची सुरुवात करण्यासाठी वसंत पंचमी शुभ दिवस मानला जातो. अनेक ठिकाणी या दिवशी पतंग उत्सव साजरा केला जातो, जो आनंद आणि उत्साहाचे प्रतीक आहे.
वसंत पंचमी हा दिवस नव्या कार्यांसाठी विशेष मानला जातो. लहान मुलांचा विद्यारंभ, संगीत, नृत्य, लेखन किंवा कोणत्याही कलासाधनेची सुरुवात या दिवशी केली जाते. अनेक ठिकाणी पतंगोत्सवाच्या माध्यमातून आनंद आणि उत्साह साजरा केला जातो.
धार्मिक मान्यतेनुसार श्रद्धेने केलेल्या सरस्वती पूजनामुळे विद्या, स्मरणशक्ती, वाणीची मधुरता आणि सर्जनशीलतेत वाढ होते. त्यामुळे विद्यार्थी, कलाकार, लेखक आणि ज्ञानसाधकांसाठी वसंत पंचमीचा दिवस विशेष फलदायी मानला जातो.